कुत्रे पृथ्वीवरील देव…; अभिनेता जॉन अब्राहमचे थेट सरन्यायाधीशांना भावनिक पत्र
एनसीआरमधून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, एक नवीन वाद सुरू झाला आहे. प्राणीप्रेमी, कार्यकर्त्यांपासून ते राजकारणी आणि अभिनेते, सर्वजण कुत्र्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. जॉन अब्राहमने सरन्यायाधीशांना याबाबत एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

एनसीआरमधून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, एक नवीन वाद सुरू झाला आहे. प्राणीप्रेमी, कार्यकर्त्यांपासून ते राजकारणी आणि अभिनेत्यांपर्यंत सर्वजण कुत्र्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमने देखील त्याची भावना व्यक्त केली आहे. जॉन देखील एक प्राणीप्रेमी आहे. त्यामुळे त्याने भाविनक पत्र लिहिलं आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना त्याने एक भावनिक पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. जॉन अब्राहम म्हणाला की “कुत्रे देखील माणसांसारखे ‘दिल्लीवाले’ आहेत आणि शतकानुशतके येथे राहत आहेत.”
हे भटके कुत्रे नाहीत, तर सामुदायिक कुत्रे आहेत
जॉनने सरन्यायाधीश बीआर गवई यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘मला आशा आहे की तुम्ही सहमत व्हाल की हे भटके कुत्रे नाहीत, तर सामुदायिक कुत्रे आहेत. ज्यांना अनेक लोक प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात आणि ते खरं तर हक्काने दिल्लीवासी आहेत. ते पिढ्यानपिढ्या माणसांचे शेजारी म्हणून येथे राहत आहेत.’ असं म्हणत त्याने कुत्र्यांबाबत दिलेल्या आदेशावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
जॉनने पत्रात काय म्हटलं?
दरम्यान हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एक दिवसापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व कुत्र्यांना 8 आठवड्यांच्या आत आश्रयस्थानात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तर, जॉनने म्हटलं आहे की, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन और अॅनिमल बर्थ कंट्रोल (ABC)डॉग रूल्स 2023 नुसार नसबंदी आणि लसीकरणानंतर कुत्र्यांना त्यांच्या घरी परत पाठवावे. त्याने कुत्र्यांबद्दल करुणा, विज्ञान-आधारित उपाय आणि भारतीय कायद्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लाखो कुत्र्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम आणि त्यामुळे मानवी आरोग्याला होणारा धोका यावरही त्याने भर दिला.आहे
रेबीजचे लसीकरण केले जाते आणि त्यानंतर कुत्रे शांत होतात
अभिनेत्याने सांगितले की जिथे एबीसी कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवला गेला तिथे तो प्रभावी ठरला. तो म्हणाला, ‘दिल्लीही हे करू शकते. नसबंदी दरम्यान कुत्र्यांना रेबीजचे लसीकरण केले जाते आणि त्यानंतर कुत्रे शांत होतात, त्यांच्या आक्रमक होण्याच्या आणि चावण्याच्या घटना कमी होतात. कुत्रे त्यांचा प्रदेश ओळखत असल्याने, ते निर्जंतुकीकरण न केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या कुत्र्यांना त्यांच्या क्षेत्रात येऊ देत नाहीत.’ अभिनेत्याच्या मते, सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना काढून टाकल्याने समस्या सुटणार नाही.
पृथ्वीवर देव असेल तर ते कुत्रे आहेत.
जॉनला ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स’ (पेटा) इंडियाचे पहिले मानद संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याने प्राण्यांबद्दल, विशेषतः कुत्र्यांबद्दलचे त्याचे विशेष प्रेम अनेक वेळा व्यक्त केले आहे. यापूर्वी त्याने त्यांच्यासाठी न्यायालयातही धाव घेतली आहे. अलीकडेच त्याने असेही म्हटले आहे की जर पृथ्वीवर देव असेल तर ते कुत्रे आहेत. आता त्याच्या या पत्रावर खरंच विचार केला जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
