बर्थडे स्पेशल : सुशांतसिंह राजपूत... बॅकग्राऊंड डान्सर ते सुपरस्टार

बर्थडे स्पेशल : सुशांतसिंह राजपूत... बॅकग्राऊंड डान्सर ते सुपरस्टार

मोठ-मोठ्या स्टार्सच्या मुलांनाही जे शक्य होत नाही, ते अभिनेता सुशांतसिंह राजपूतने गेल्या काही वर्षात करुन दाखवले. बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूडमधील सुपरस्टार हा त्याचा प्रवास वाखणण्याजोगा आहे. आपल्या अभिनयाने सुशांतने भल्या-भल्याने दखल घ्यायला लावली आणि सिनेसृष्टीत आपली खास जागा निर्माण केली.

21 जानेवारी 1986 रोजी बिहारमधील पटना शहरात जन्मलेल्या सुशांतचा प्रवास प्रचंड अशा मेहनतीने भरलेला आहे. त्याचा प्रवास वाचताना, ऐकताना, पाहताना भारावून जायला होतं. त्याने मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत मोठी झेपत घेतली आहे. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सुशांतसिंह राजपूतची गणना होते.

सुशांत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. मात्र, डान्स आणि अभिनयाची ओढत त्याला काही गप्प बसू देत नव्हती. त्यामुळे तो आपसूक सिनेमासृष्टीकडे ओढला गेला. सुरुवातीला शामक डावर यांच्या डान्स ग्रुपमध्ये सुशांत जॉईन झाला. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून कॉमनवेल्थ गेम्स, फिल्म फेअर यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम करु लागला.

अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत डान्स करण्याचा प्रसंग सुशांत कायम आठवतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते की, “कॉमनवेल्थ गेम्समध्ये डान्सदरम्यान काही सेकंदांसाठी ऐश्वर्याला उचलायचं होतं. हा क्षण सर्वात मोठा होता. कारण ऐश्वर्या राय यांचा मी खूप मोठा चाहता आहे.”

नादिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रुप आणि बॅरी जॉन्स यांच्या ड्रामा क्लाससोबतही सुशांत जोडला गेला होता. बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेतून सुशांतने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळेच. त्यानंतर ‘जरा नच के दिखा’ आणि ‘झलक दिखला जा’ या डान्स रियालिटी शोमुळे सुशांत घराघरात पोहोचला.

टीव्ही मालिका, रियालिटी शो याच्यानंतर सुशातसिंह राजपूतने सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेक कपूर यांच्या ‘काय पो चे’साठी सुशांतने ऑडिशन दिलं आमि त्यात त्याला मुख्य भूमिकाही मिळाली. सुशांतच्या अभिनयाचं समीक्षकांसह प्रेक्षकांनीही कौतुक केलं. त्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमामुळे तर सुशांतचा बॉलिवूडमधील भावही वधारला. अगदी आघाडीच्या अभिनेत्यांच्या रांगेत जाऊन सुशांत बसला.

सुशांत आता बॉलिवूडमधील बिझी अभिनेता म्हणून गणला जाऊ लागला आहे. सध्या सुशांतला जवळपास 12 सिनेमा ऑफर झाले असून, अत्यंत अभ्यासपूर्वक तो सिनेमांची निवड करतो. बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड सुपरस्टार हा सुशांतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी असाच आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *