वडिलांच्या निधनानंतर गायकाने गायले गाणे, इतके हिट ठरले की आजही अनेकांच्या प्ले लिस्टमध्ये
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणे गायले आहे. त्यांनी हे गाणे वडिलांच्या निधनानंतर प्रचंड दु:खात गायले आहे. आजही गाणे प्रचंड हिट आहे. अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे.

बॉलिवूडमधील गाणी हे जगभरात लोकप्रिय आहेत. गाण्यांचे बोल, संगीत, पार्श्वभूमी ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला पडताना दिसत आहे. या गाण्यांच्या मागे देखील रंजक कहाणी असते. कधी एखादा गायक रागाच्या भरात गाणे गातो तर कधी त्याच्या मागे एखादी भावनिक कथा दडलेली असते. सध्या बॉलिवूडमध्ये असे एक गाणे चर्चेत आहे. हे गाणे गायकाने वडिलांच्या निधनानंतर गायले होते. पण श्रोत्यांना हे गाणे प्रचंड आवडले.
आम्ही गायक कैलाश खेर यांच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक ‘पिया घर आवेंगे’ विषयी बोलत आहोत. या गाण्यामागे लपलेली भावुक कथा त्यांनी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की हे गाणं त्यांच्या वडिलांच्या शेवटच्या क्षणांपासून प्रेरित आहे. त्यांनी 2008 मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. आयएएनएसशी झालेल्या संवादात कैलाश खेर यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांचे जाणे कोणत्याही वेदनादायक अंतसारखे नव्हते, तर ते एक आनंददायी निरोप होते. त्यांनी सांगितले की वडिलांचे प्राण जेव्हा शरीर सोडून परमात्म्याकडे जात होते, त्या अवस्थेनेच त्यांना हे गाणं लिहायला प्रेरित केले. हे गाणं आत्म्याच्या परमात्म्याशी एकरूप होण्याच्या आध्यात्मिक प्रवासाचे चित्रण करते.
कैलाश खेर यांनी म्हटले, “माझ्या आईचा मृत्यू नंतर झाला. वडील आधी गेले, त्यांचा मृत्यू 2008 मध्ये झाला. आईचा मृत्यू 2012 मध्ये झाला. जेव्हा वडील मृत्युशय्येवर होते, शरीर सोडत होते, तेव्हा आत्म्याच्या परमात्म्याशी मिळण्याची जी अवस्था होती, त्यावर मी हे गाणं बनवलं.”
गायकाने वडिलांच्या शेवटच्या क्षणांची आठवण करताना सांगितले की सामान्यतः असे मानले जाते की मरणाच्या दरात असलेल्या व्यक्तीला खूप वेदना होतात, तो ओरडतो-किंचाळतो, पण त्यांच्या वडिलांसोबत असं काही घडलं नाही. ते पूर्णपणे शांत आणि आनंदाच्या अवस्थेत होते.
त्यांनी पुढे सांगितले, “मरणारी व्यक्ती नेहमी दुःखातच असते असं नाही. कधीकधी तो वेदनेने ओरडतो, पण नंतर शांत होतो. माझे वडील तर जणू गात गात, परम आनंदाच्या अवस्थेत गेले. फक्त ते पाहून मी हे गाणं लिहिलं.” सोशल मीडियावर चाललेल्या काही दाव्यांच्या पार्श्वभूमीवर, कैलाश यांनी या गाण्यामागील खरी प्रेरणा स्पष्ट करताना सांगितले की त्यांच्या वडिलांची ती शांत विदाईच होती, ज्यामुळे त्यांना हे गाणं लिहायला प्रेरित झाले.
‘पिया घर आवेंगे’ हे 2009मधील एक भारतीय फ्यूजन गाणं आहे, जे कैलाश खेर, परेश कामथ आणि नरेश कामथ यांनी तयार केले होते. हा ट्रॅक 11 जून 2009 रोजी ‘चंदन में’ या अल्बमचा भाग म्हणून रिलीज झाला होता, ज्याला ‘कैलासा चंदन में’ या नावानेही ओळखले जाते.
