फेअरनेस क्रीम घेतात, पण कंडोम खरेदी करताना..; मतावरून काजोल तुफान ट्रोल

अभिनेत्री काजोल तिची मतं अत्यंत बेधडकपणे आणि स्पष्टपणे मांडताना दिसते. परंतु यावरून अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता काजोलने तिच्याच चॅट शोमध्ये कंडोमच्या खरेदीवरून जे मत मांडलं आहे, त्यावरून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

फेअरनेस क्रीम घेतात, पण कंडोम खरेदी करताना..; मतावरून काजोल तुफान ट्रोल
Kajol
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2025 | 11:59 AM

काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघी स्पष्टवक्त्या अभिनेत्री आहेत. विविध मुद्द्यांवर ते आपली मतं बेधडकपणे मांडतात. या दोघींचा एक टॉक शो सध्या तुफान चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये सलमान खान, विकी कौशल, जान्हवी कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कंडोमच्या मुद्द्यावरून या चौघांमध्ये चर्चा रंगली होती. ‘टू मच’ या चॅट शोमध्ये कंडोम खरेदी करण्यावरून भारतीय समाजाच्या विचाराबद्दल ही चर्चा झाली.

‘फेअरनेस क्रीम (गोरं होण्यासाठी क्रीम) खरेदी करण्यापेक्षा कंडोम खरेदी करताना भारतीय जास्त लाजतात का’, असा हा चर्चेचा विषय होता. या विषयाच्या बाजूने किंवा त्याच्या विरोधात पाहुण्यांना युक्तीवाद करायचा होता. तेव्हा काजोल आणि सोनाक्षी कबूल करतात की आजही असंख्य भारतीय कंडोम खरेदी करण्यास संकोच करतात. काजोल म्हणाली, “फेअरनेस क्रीम खरेदी करताना लोक ब्रँडचं नाव अभिमानाने घेतात, परंत कंडोम मागताना ते सहसा त्यांची नजर चोरतात. काहीजण तर त्यांच्या मित्रांना कंडोम खरेदी करून देण्यासाठी सांगतात.” तिच्या या मताचं सोनाक्षीनेही समर्थन केलं. तर दुसरीकडे मनीष मल्होत्रा आणि ट्विंकल खन्ना म्हणाले की, भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. आताची तरुण पिढी पूर्वीपेक्षा अधिक मोकळ्या मनाची असल्याचं मत त्यांनी मांडलं.

आता लोकांमध्ये इतका संकोचलेपणा राहिलेला नाही, असं जेव्हा मनीष मल्होत्रा म्हणतो, तेव्हा सोनाक्षी त्याला प्रश्न विचारते, “जर लोकांना कंडोम खरेदी करण्यास लाज वाटत नसेल, तर मग आपली लोकसंख्या इतकी का जास्त आहे?” तिचा हा सवाल ऐकून काजोल मोठ्याने हसते. या संपूर्ण चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी फेअरनेस क्रीमशी तुलना केल्यावरून काजोलची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी सोनाक्षीच्या मताचं समर्थन केलं आहे.