“रिक्षा-टॅक्सीसाठी करीना रस्त्यावर ओरडत होती पण..”; चाकूहल्ल्यानंतर सैफचा मोठा खुलासा

चोराकडून झालेल्या हल्ल्यानंतर मध्यरात्री 3 वाजता सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर पाच तास सर्जरी करण्यात आली होती. सैफच्या पाठीतून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आला होता. पाच दिवसांच्या उपचारानंतर 21 जानेवारी रोजी त्याला डिस्चार्ज मिळाला होता.

रिक्षा-टॅक्सीसाठी करीना रस्त्यावर ओरडत होती पण..; चाकूहल्ल्यानंतर सैफचा मोठा खुलासा
Kareena Kapoor and Saif Ali Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 10, 2025 | 10:09 AM

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला. चोराने सैफवर सहा वार केले, त्यापैकी दोन वार गंभीर होते. या घटनेनं कलाविश्वात खळबळ उडाली. लिलावती रुग्णालयात पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफला डिस्चार्ज मिळाला होता. आता ‘दिल्ली टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने संपूर्ण घटना सांगितली. रुग्णालयात जाण्यासाठी करीना रस्त्यावर रिक्षा किंवा टॅक्सीसाठी ओरडत होती, असं सैफने सांगितलं. 16 जानेवारीच्या मध्यरात्री घरात नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा सैफने या मुलाखतीत केला.

काय म्हणाला सैफ?

घडलेल्या घटनेविषयी सैफ म्हणाला, “त्यादिवशी करीना बाहेर डिनरसाठी गेली होती आणि मला सकाळी काही काम होतं म्हणून मी घरातच राहिलो. डिनरनंतर ती घरी परतली. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि झोपी गेलो. काही वेळानंतर घरकाम करणारी महिला धावत आली आणि तिने घरात चोर शिरल्याचं सांगितलं. जेहच्या रुममध्ये एक माणूस चाकू घेऊन शिरलाय आणि तो पैसे मागतोय, असं ती म्हणाली.”

हातात चाकू घेऊन मुलाच्या खोलीत चोराला पाहून सैफचा संयम सुटला आणि त्याने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत चोराने सैफच्या पाठीवर, मानेवर आणि हातावर चाकूने वार केले. चोर आणि सैफ यांच्या झटापट सुरू असताना करीनाने जहांगीरला खोलीबाहेर काढलं आणि त्याला तैमुरच्या रुममध्ये घेऊन गेली. खोलीतून मुलांना बाहेर काढण्यासाठी करीना जोरजोरात ओरडत असल्याचं सैफने सांगितलं.

“खोलीतून बाहेर पडण्यासाठी करीना ओरडत होती. चोर घरातच असेल आणि त्याच्यासोबत इतरही काही जण असतील या भीतीने करीनाने सर्वांत आधी जहांगीरला खोलीबाहेर काढलं होतं. त्यानंतर ती मला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी धडपड करत होती. आम्ही सर्वजण खाली आलो. करीना रस्त्यावर रिक्षा किंवा टॅक्सीसाठी हाका मारत होती. माझ्या पाठीत वेदना होत असल्याचं मी तिला सांगितलं. ती म्हणाली, तू रुग्णालयात जा आणि मी मुलांना घेऊन बहीण करिश्माच्या घरी जाते. ती प्रचंड घाबरली होती आणि भीतीने सर्वांना फोन करत होती. पण कोणीच फोन उचलत नव्हतं. त्या क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तिला चिंतेत पाहून मी म्हणालो, मी मरणार नाही”, अशा शब्दांत सैफने संपूर्ण प्रसंग उलगडून सांगितला.