
बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटींच्या जोड्या आहेत ज्यांच्या प्रेमाने लग्नाची स्वप्न तर पाहिली होती पण तिथपर्यंत तो प्रवास पोहोचला नाही. यातीलच एक जोडी म्हणजे करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन. करिश्मा कपूर एकेकाळी बॉलिवूडची नंबरवन अभिनेत्री होती. तिने तिच्या कारकिर्दीत प्रसिद्धीची उंची गाठली होती. आजही तिची फॅनफॉलोईंग कमी नाहीये. चित्रपटांप्रमाणेच तिचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं आहे.
करिश्मा बच्चन कुटुंबाची सून होणार होती.
जेव्हा करिश्मा तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती. तेव्हा ती बच्चन कुटुंबाची सून होणार होती. तिचे अभिषेक बच्चनशी लग्न ठरले होते. जया बच्चन यांनीही तिला सून म्हणून मीडियासमोर ओळख करून दिली होती. पण त्याच्या काहीच महिन्यांनी करिश्मा आणि अभिषेकचे नाते तुटले. याचं नेमकं कारण मात्र समोर आलं नाही. पण हे नातं तुटण्याचा करिश्मावर मात्र खूप परिणाम झाला होता. याचा सर्वात जास्त त्रास हा करिश्माला झाला होता. तिला मानसिक धक्का बसलास होता. याबद्दल करिश्मानेच एका मुलाखतीत सांगितले होते.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं. ते एकमेकांसोबत खूप आनंदी होते. परंतु काही कारणास्तव त्यांचे नाते टिकले नाही आणि काही महिन्यांतच त्यांचा ठरलेला साखरपुडाही मोडला. तथापि, याचे कारण बच्चन कुटुंबाने किंवा कपूर कुटुंबाने किंवा स्वतः करिश्मा आणि अभिषेकने उघड केले नाही.
अभिषेक बच्चनसोबत नातं तुटणे वेदनादायक होतं
अभिषेक बच्चनसोबतचा तिचा विवाह तुटला तेव्हा तिने चित्रपटांपासूनही स्वतःला दूर केले. तथापि, 2003 मध्ये एका मुलाखतीत करिश्माने अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या तुटलेल्या लग्नाबद्दल, तिच्या नात्याबद्दल सांगितले होते. तिने अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या तुटलेल्या नात्याला खूप वेदनादायक म्हटलं तसेच असं कोणत्याही मुलीसोबत होऊ नये कारण खरंच त्यातून जाणे फार वेदना देणारं आहे. असही तिने म्हटले होते. लग्न तुटल्यानंतर करिश्माने चित्रपटांपासूनही स्वतःला दूर केले होते आणि तिने यावर प्रतिक्रिया देखील दिली होती.
मी माझे दुःख सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यास तयार नव्हते
करिश्मा म्हणाली होती, ‘मी हे जाणूनबुजून केलं होतं. मी माझ्या कोशातच गुंतले होते. मला त्यातून बाहेर पडण्यासाठी फार काळ गेला. मी माझे दुःख सर्वांसमोर व्यक्त करण्यास तयार नव्हते. त्यामुळे मी गप्प राहिले. कारण मी अशाच प्रकारची व्यक्ती आहे. मी नेहमीच कमी शब्द बोलणारी व्यक्ती आहे.’
मला माझ्या वेदना आणि त्रासांना एकटीनं सामोरं जावं लागलं
करिश्मा पुढे म्हणाली, ‘त्या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी खूप वेदनादायक होती. कोणत्याही मुलीने यातून जावं असं वाटत नाही. मला माझ्या वेदना आणि त्रासांना एकटीनं सामोरं जावं लागलं. माझा विश्वास आहे की वेळ हा सर्वोत्तम उपचार आहे. जरी मी खूप त्रास सहन केला असला तरी, जे काही घडले ते मी स्वीकारले होतं. मी फक्त एवढेच म्हणेन की जे नशिबात आहे ते घडेल. फक्त तेव्हा मी माझ्या समस्यांना तोंड देण्यासाठी भावनिकदृष्ट्या तयार नव्हते.’
2002 मध्ये साखरपुडा आणि 2003 मध्ये ब्रेकअप, करिश्माची आई कारण होती का?
करिश्मा आणि अभिषेक यांच्या नात्यांच्या चर्चा या 2002 मध्ये येत होत्या. परंतु जानेवारी 2003 मध्ये त्यांचे नाते तुटले. त्यानंतर बच्चन कुटुंब आणि कपूर कुटुंबात दुरावा निर्माण झाला. काही वृत्तांनुसार करिश्माची आई बबिता आणि बच्चन कुटुंबातील मतभेदांमुळे हे लग्न तुटल्याचं म्हटलं जातं. मात्र अभिनेत्री म्हणाली की तिच्या कुटुंबाने त्या कठीण काळात तिला मदत केली. करिश्मा म्हणाली की तिचे आईवडील, आजी, काकू आणि बहीण करिना यांच्या मदतीने ती त्या दुःखद काळातून बाहेर पडू शकली
करिश्माचे संजय कपूरसोबतचे लग्न आणि घटस्फोट, पतीचा मृत्यू
अभिषेक बच्चनसोबतचे लग्न मोडल्यानंतर अभिषेकने काही वर्षांनी ऐश्वर्या रायशी लग्न केले, तर करिश्माने दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूरसोबत लग्न झाले आहे. तथापि, लग्नाच्या काही वर्षांनी करिश्मा आणि संजय यांचाही घटस्फोट झाला. 12 जून 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूरचेही निधन झाले.