
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘स्पेशल ऑप्स’ या वेब सीरिजमध्ये हिम्मत सिंगची भूमिका साकारलेला अभिनेता के. के. मेनन ‘वोट चोरी’ मोहिमेचा प्रचार करताना दिसला. या व्हिडीओबाबत त्याने आता राग व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या या मोहिमेचा भाग नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे. हा व्हिडीओ माझ्या परवानगीशिवाय वापरण्यात आला आहे, असं त्याने म्हटलंय.
काँग्रेसने त्यांच्या मोहिमेसाठी वापरलेल्या क्लिपवर टिप्पणी करत के. के. मेननने लिहिलं, ‘कृपया लक्षात घ्या की मी या जाहिरातीत काम केलेलं नाही. माझ्या स्पेशल ऑप्स या वेब सीरिजची एक प्रमोशनल क्लिप एडिट करण्यात आली आहे. तसंच ती माझ्या परवानगीशिवाय वापरली गेली आहे.’
काँग्रेसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये के. के. मेनन म्हणतोय, “थांबा, थांबा.. स्क्रोल करणं थांबवा. जर तुम्ही ही रील पाहत असाल तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे?” यानंतर व्हिडीओमध्ये आणखी एक व्यक्ती दिसत आहे, जो वोट चोरीविरुद्धच्या मोहिमेत सहभागी होण्याबद्दल बोलताना दिसत आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, ‘हिम्मत सिंग काहीतरी बोलत आहेत, ते लगेच अंमलात आणा.’ या व्हिडीओद्वारे लोकांना मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. परंतु के. के. मेननने स्पष्ट केलंय की त्याने कोणत्याही मोहिमेत सहभाग घेतला नाही. त्याची ही क्लिप वापरण्यापूर्वी काँग्रेसने परवानगीदेखील घेतली नव्हती. तसंच या व्हिडीओमध्ये स्पेशल ऑप्सच्या दुसऱ्या सिझनचं थीम साँगसुद्धा वापरलं गेलंय. के. के. मेननच्या या स्पष्टीकरणावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. एक लाख मतांची चोरी केवळ एकाच लोकसभा मतदारसंघात झाल्याचा आरोप त्यांनी डेटा दाखवत केला. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 40 लाखांहून अधिक मतं संशयाच्या घेऱ्यात आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. वोट चोरीचा हा आरोप करत काँग्रेसने त्याविरोधात मोहीम सुरू केली आहे.