Bhushan Thakare: हातात बाबासाहेबांचा फोटो, गळ्यात माळ… 1 कोटी जिंकून दीड वर्षांनी घरी गेलेल्या भूषणचे जळगावात जंगी स्वागत, Videoची चर्चा
KBC 18 winner Bhushan Thakare: भूषणचे आई-वडील रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट घेत होते. यूपीएससीच्या तयारीसाठी मुंबईत आलेल्या भूषणच्या बँक खात्यात त्यावेळी केवळ २४ रुपये शिल्लक होते. तो फक्त २४ रुपये घेऊन मुंबईत आला होता.

कौन बनेगा करोडपती या क्वीज शोमध्ये बुद्धीमत्तेच्या जोरावर अनेकजण लाखो रुपये जिंकतात. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा 18वा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये महराष्ट्रातील जळगावमधील मराठमोळ्या भूषण ठाकरेने एक कोटी रुपये जिंकले. करोडपती झाल्यानंतर भूषण आपल्या घरी परतला आहे. जवळपास दीड वर्षांनंतर भूषण घरी गेला आहे. परिस्थितीमुळे भूषणला घरी जाता आले नव्हते. पण आता एक कोटी जिंकल्यानंतर तो आनंदाने घरी गेला आहे. जळगावकरांनी त्याचे तितक्याच आनंदाने स्वागत केले आहे.
भूषणचं मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील बालवाडी आहे. तिथे त्याचं मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं. या स्वागताचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. भूषण गावात परतल्यानंतर ग्रामस्थ आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्याच्यासाठी खास मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मिरवणुकीत त्याला खांद्यावर उचलण्यात आलं, फुलांचे हार घालण्यात आले आणि गुलाल उधळण्यात आला. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर त्याच्या यशाचा आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता.
View this post on Instagram
हातात बाबासाहेबांचा फोटो, गळ्यात माळ
या मिरवणुकीतील एका गोष्टीने सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. भूषणच्या गळ्यात फुलांचे हार होते, तर हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. त्याने बाबासाहेबांचा फोटो अभिमानाने उंच धरून मिरवणुकीत सहभाग घेतला. त्यामुळे स्वागताचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक चर्चेत आले.
खात्यात फक्त 24 रुपये
भूषणचा ‘कौन बनेगा करोडपती’मधील प्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. वयाच्या २८ व्या वर्षी तो यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्याने इतिहास विषयातून पदवी घेतली आहे. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. त्याचे आई-वडील रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट घेत होते. यूपीएससीच्या तयारीसाठी मुंबईत आलेल्या भूषणच्या बँक खात्यात त्यावेळी केवळ २४ रुपये शिल्लक होते. तो फक्त २४ रुपये घेऊन मुंबईत आला होता.
कार्यक्रमात १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यानंतर भूषणने ही मोठी रक्कम जिंकली. त्याच्या यशानंतर शोचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी त्याला भावुक होत मिठी मारली. हा क्षणही प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजला आहे.
