1 वर्षे सरकारी रेडिओवर बॅन करण्यात आलेलं किशोर कुमार यांची गाणी, नेमकं काय घडलेलं?
किशोर कुमार यांच्या गाण्यांवर लागली होती सरकारी रेडिओ आणि दूरदर्शनवर बंदी; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. आपल्या सुरेल आवाजाने आणि अविस्मरणीय गाण्यांनी त्यांनी संगीतविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र, आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर सरकारी रेडिओ आणि दूरदर्शनवर बंदी घालण्यात आली होती. या घटनेचा किस्सा त्यांचा मुलगा अमित कुमार यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला होता.
1975 ते 1977 या काळात देशात आणीबाणी लागू होती. अमित कुमार यांच्या माहितीनुसार, त्यावेळी किशोर कुमार आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. पार्श्वगायक म्हणून त्यांची मोठी मागणी होती.
आणीबाणी लागू झाल्यानंतर किशोर कुमार यांना दिल्लीतील मंत्रालयाकडून फोन आला. एका अधिकाऱ्याने त्यांना दिल्लीला येण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशीच्या विमानाने दिल्लीला पोहोचण्याची आणि त्यानंतर एका कार्यक्रमात सहभागी होण्याची सूचना त्यांना देण्यात आली होती.
मात्र, किशोर कुमार यांनी या प्रस्तावाला तात्काळ होकार दिला नाही. त्यांनी अधिकाऱ्याला आपला प्रतिनिधी पाठवण्याची अट घातली. अमित कुमार यांच्या म्हणण्यानुसार, किशोर कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, अशा पद्धतीने ते दिल्लीला येणार नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे संबंधित अधिकारी नाराज झाल्याचं सांगितलं जातं.
दोन तासांतच लागली गाण्यांवर बंदी?
अमित कुमार यांनी सांगितलेल्या किस्स्यानुसार, या फोनवरील संभाषणानंतर अवघ्या दोन तासांत किशोर कुमार यांच्या गाण्यांवर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बंदी घालण्यात आली.
त्यानंतर सरकारी माध्यमांवर त्यांची गाणी ऐकू येणं बंद झालं. मात्र, या बंदीचा त्यांच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झाला नाही. त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या आवाजाची जादू कायम राहिली.
आणीबाणी संपल्यानंतर किशोर कुमार यांची गाणी पुन्हा रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित होऊ लागली. या घटनेमुळे आपल्या निर्णयांवर ठाम राहणारे आणि स्पष्टवक्ते कलाकार म्हणून त्यांची प्रतिमा आणखी ठळक झाली.
किशोर कुमार यांची अजरामर गाणी
किशोर कुमार यांच्या गायकीची सुरुवात 1948 मध्ये ‘जिद्दी’ या चित्रपटातून झाली. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी त्यांना गाण्याची संधी दिली होती. त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक अविस्मरणीय गाणी दिली.
