महेंद्रसिंह धोनीच्या मेहुण्याला डेट करतेय क्रिती सनॉन; 9 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत स्टेडियमवर दिसली अभिनेत्री
अभिनेत्री क्रिती सनॉनला नुकतंच भारत विरुद्ध इंग्लंडच्या क्रिकेट मॅचदरम्यान स्टेडियममध्ये बॉयफ्रेंड कबीर बाहियासोबत पाहिलं गेलं. यावेळी महेंद्रसिंह धोनीसुद्धा स्टेडियमवर उपस्थित होता. कबीर आणि धोनीचं खास नातं आहे.

अभिनेत्री क्रिती सनॉन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिती ही बिझनेसमन कबीर बाहियाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांना याआधीही विविध कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. मात्र आता भारत आणि इंग्लंडदरम्यान एजबेस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे क्रिकेट मॅचदरम्यान या दोघांच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जेव्हा कॅमेरा स्टेडियममध्ये बसलेल्या क्रिती आणि कबीर यांच्याकडे गेला, तेव्हा महेंद्रसिंह धोनीसुद्धा त्यांच्या मागे बसलेला दिसला. क्रिती सनॉनचा बॉयफ्रेंड कबीरचं धोनी आणि त्याच्या पत्नीशी खास नातं असल्याचं फार कमी लोकांना माहीत असेल. कबीर हा महेद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीचा चुलत भाऊ आहे. या नात्याने कबीर हा धोनीचा मेहुणा आहे.
कबीर बाहिया हा लंडनमधील मोठा बिझनेसमन असून तो अत्यंत आलिशान आयुष्य जगतो. तो नेहमी धोनी आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसून येतो. कबीरचे वडील कुलजिंदर बाहिया हे ‘साऊथ हॉल ट्रॅव्हल’चे संस्थापक आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक लोकांशी कबीरचे चांगले संबंध आहेत. नुकताच क्रिती सनॉनने तिचा 34 वा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला होता. या सेलिब्रेशनमध्ये कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबतच कबीरसुद्धा सहभागी झाला होता. अत्यंत श्रीमंत एनआयआरमध्ये कबीरचा समावेश होतो. तर दुसरीकडे कबीर हा वयाने क्रितीपेक्षा जवळपास नऊ वर्षांनी लहान असल्याचं कळतंय. कबीरचा जन्म नोव्हेंबर 1999 मध्ये झाला आहे.
पहा व्हिडीओ-
Kriti sanon with his Bf Kabir Bahia who is related to Dhoni’s family also present in stadium along with MSD👀 pic.twitter.com/iwbftf3S5u
— Shikha (@Shikha_003) July 14, 2026
क्रिती सनॉन आणि कबीर बाहिया यांनी अद्याप त्यांचं रिलेशनशिप माध्यमांसमोर जाहीर केलं नाही. मात्र त्यांच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. इतकंच नव्हे तर क्रितीची बहीण नुपूरच्या लग्नसोहळ्यातही कबीरने हजेरी लावली होती. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता स्टेडियममध्ये दोघांना एकत्र क्रिकेट मॅच बघताना पाहून चाहते खुश झाले आहेत. त्याचसोबत दोघांनी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना अप्रत्यक्षपणे पूर्णविराम दिला आहे. क्रिती ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच तिचा ‘कॉकटेल 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.