
‘किंग ऑफ मेलडी’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचं खासगी आयुष्य सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतं. कुमार सानू यांची पूर्व पत्नी रीटा भट्टाचार्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. तिसऱ्या प्रेग्नंसीदरम्यान त्यांनी प्रचंड त्रास दिल्याचा आरोप रीटा यांनी केला आहे. ‘आशिकी’ या चित्रपटाच्या यशानंतर कुमार सानू यांच्या वागणुकीत बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं. मला पार्लर जाण्याची किंवा वॅक्सिंग करण्याचीही परवानगी नव्हती, असं त्या म्हणाल्या.
‘फिल्म विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत रीटा भट्टाचार्य म्हणाल्या, “मी गरोदर असताना त्यांनी मला कोर्टात ओढून नेलं. त्यावेळी त्यांचं एक अफेअरसुद्धा सुरू होतं, ज्याचा खुलासा आज झाला आहे. त्यावेळी माझं वय खूप कमी होतं. माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखं मला वाटत होतं. माझ्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला होता. मला घराबाहेर जाण्याची, मैत्रिणींना भेटण्याची आणि मेकअप करण्याचीही परवानगी नव्हती. मी गरोदर असताना माझ्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था ठीक नव्हती. ते जेव्हा घराबाहेर जायचे, तेव्हा किचनमधल्या कपाटाला टाळं लावून जायचे. मला जेवायचं असेल तर वहिनीच्या घरी जावं लागायचं.”
“मी दुकानातून काही मागवलं तरी दुकानदार थेट नकार द्यायचा. कुमार सानू साहब यांनी द्यायला नकार दिल्याचं ते सांगायचे. मी कोर्टातही त्यांना माझी खिल्ली उडवताना पाहिलंय. जेव्हा जान माझ्या पोटात होता, तेव्हा मला नीट जेवणही मिळत नव्हतं. मी सतत आजारी असायची”, असे गंभीर आरोप रीटा यांनी कुमार सानू यांच्यावर केले आहेत.
कुमार सानू यांनी 1986 मध्ये रीटा भट्टाचार्य यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. जिको, जारी आणि जान कुमार सानू अशी त्यांची नावं आहेत. 1994 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यावेळी कुमार सानू यांचं अभिनेत्री कुनिका सदानंदशी अफेअर होतं. विवाहित असताना ते कुनिकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. घटस्फोटानंतर तिन्ही मुलांची कस्टडी रीटा यांना मिळाली.