Mahesh Manjrekar: पत्नी मेधा यांच्या कॅन्सरवर पहिल्यांदाच बोलले महेश मांजरेकर; म्हणाले ‘आम्हाला सहानुभूती नको..’
महेश मांजरेकर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पत्नी मेधा मांजरेकर यांच्या कॅन्सरविषयी पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाले. आम्ही कॅन्सरला घाबरत नाही, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

Mahesh Manjrekar: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि निर्माती मेधा मांजरेकर यांच्या कॅन्सरच्या उपचारांबाबत पती आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलं आहे. सध्या महेश मांजरेकर त्यांच्या आगामी ‘बंडखोर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याच निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मेधा यांच्या आजारपणाचा काळ, त्यांची उपचारपद्धती आणि कुटुंबाने या परिस्थितीला कसं सामोरं गेलं, याबद्दल माहिती दिली. महेश मांजरेकर यांनी सांगितलं की, ‘बंडखोर’ चित्रपटात मेधा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होत्या. मात्र, त्याच काळात त्यांच्या कॅन्सरचं निदान झालं. उपचारांदरम्यान त्यांचे केस गळू लागले आणि केमो थेरपीसह इतर उपचार सुरू होते. त्यामुळे चित्रपटातील त्यांची भूमिका करणं शक्य झालं नाही. मेधा यांच्या जागी नंतर दुसऱ्या अभिनेत्रीने ही भूमिका साकारली.
या कठीण काळाबद्दल बोलताना महेश यांनी कॅन्सरकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सांगितला. त्यांच्या मते, आज वैद्यकीय क्षेत्रात अनेक उपचार आणि औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे आजाराचं निदान झाल्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा उपचारांवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतःच्या कॅन्सरच्या अनुभवाचाही उल्लेख करत आपण मेधा यांच्यासमोर एक उदाहरण असल्याचं सांगितलं.
View this post on Instagram
“आम्ही कॅन्सरला घाबरत नाही. माझं एक लॉजिक आहे, की मी मला कॅन्सर झाला असं कधी म्हणत नाही. तो दहा वर्षांच्या मुलालाही झालाय, वीस वर्षांच्या मुलालाही झाला आहे. आता तर कॅन्सरच्या उपचारासाठी बरीच औषधंसुद्धा उपलब्ध आहेत. माणूस तर डेंग्यूनेही गेला आहे. मग डेंग्यू झालेल्या माणसाने का घाबरू नये? कॅन्सरने माणूस गेला आणि नाहीसुद्धा. मी स्वत:ला नाही गेलेल्यांमध्ये गणतो. मेधाने मला दोन वर्षे बघितलं होतं, त्यामुळे तिची तशी तयारी झाली होती. आम्ही एकदम चिल आऊट होतो. आमच्याकडे कोणी येऊन सहानुभूती देऊ नये”, असं महेश मांजरेकर म्हणाले.
मेधा यांनीही परिस्थिती अत्यंत शांतपणे स्वीकारली. महेश यांना याआधी कॅन्सरचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून मेधा यांना मानसिक आधार मिळाला. “तुला झाला, मला पण झाला,” अशा भावनेने दोघांनीही या संकटाकडे पाहिलं आणि कुटुंबाने त्यांना सकारात्मक वातावरण देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मेधा मांजरेकर यांनी काही काळापूर्वी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून आपल्या उपचारांच्या प्रवासाची माहिती दिली होती. निदान, शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनच्या काळात आपल्याला कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या व्यक्तींचं प्रेम आणि आधार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
