महामंडलेश्वर बनण्यासाठी ममता कुलकर्णीने किन्नर आखाडाच का निवडला? जाणून घ्या कारण..
नव्वदच्या दशकातील लोकप्रिय आणि चर्चेतली अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. महाकुंभ 2025 मध्ये तिने संन्यास घेतला आणि आपल्या आयुष्याची एक वेगळी सुरुवात केली आहे. यासाठी तिने किन्नर आखाडाच का निवडला, ते जाणून घेऊयात..

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एकेकाळी बॉलिवूड गाजवल्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीपासून दूर गेली. त्यानंतर अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियाशी तिचे संबंध जोडले गेले. गेल्या अनेक वर्षांपासून ममता भारताबाहेरच राहत होती. आता महाकुंभच्या निमित्ताने ती भारतात परतली. भारतात परतल्यानंतर ममताने संन्यास घेतला आहे. तिने महाकुंभ 2025 दरम्यान संन्यास घेतल्याची माहिती समोर येत आहेत. महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याकडून तिने दीक्षा प्राप्त केली आहे. 25 जानेवारी रोजी ममता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. शुक्रवारी प्रयागराजमधील संगमध्ये तिने स्वत:चं पिंडदान केलं. त्याचठिकाणी तिचा पट्टाभिषेक पार पडला. आता ममता कुलकर्णीला नवीन नावंही मिळालं असून ती श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार.
नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णी ही बॉलिवूडमधील अत्यंत चर्चेतली अभिनेत्री होती. तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीपासून फारकत घेतली. ममताच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास तिने मुंबईतील विले पार्ले इथल्या सेंट जोसेफ कॉन्वेंट हायस्कूलमध्ये ती शिकली. ही फक्त मुलींची सरकारी शाळा आहे. नन आणि शिक्षक याठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतात.
ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर आखाडाच का निवडला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यामागचं कारण म्हणजे किन्नर आखाडा हा सनातन धर्माच्या 13 प्रमुख आखाड्यांपेक्षा वेगळा आहे. किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमचं भौतिक आयुष्य जगता येतं. यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते.




वादग्रस्त आयुष्य
ममता कुलकर्णी तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. 1993 मध्ये अभिनेत्रीने स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. हे मासिकाचे प्रकाशित होताच बर्यापैकी खळबळ उडाली होती. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. ममताबद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की, तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केलं. परंतु, अभिनेत्रीने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं. असं म्हणतात की ममता विकीसोबत 10 वर्षे दुबईत राहत होती. त्याचबरोबर असंही म्हटलं जात होतं की, तिने तिच्या पतीसह मिळून अनेक बेकायदेशीर कामंही केली.