हाच तो भाड्या, याला चपलेनं मारलं पाहिजे; अभिनेत्यावर महिलांचा राग अनावर, नेमकं काय झालं?
Ashok Shinde: मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते अशोक शिंदे यांनी एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेली कित्येक दशके काम करणारे अभिनेते अशोक शिंदे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी मराठी मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यांनी कधी लीड भूमिका केली तर कधी व्हिलनचा रोल केला. त्यांचे नाव जरी घेतले तरी अनेकांच्या डोळ्यासमोर साधाभोळा बाप अशी व्यक्तीरेखा उभी राहते. पण अशोक शिंदे यांच्यावर एक वेळ अशी आली होती की भर कार्यक्रमामध्ये काही महिला त्यांना पाहून चिडल्या होत्या.
आजकाल सोशल मीडियामुळे प्रेक्षक कमेंट्सच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या कामाची पोचपावती देत असतात. पण त्यापूर्वी प्रेक्षक कलाकार समोर दिसले की त्यांच्या कामाची पोचपावती द्यायचे. अशोक शिंदे यांची ‘काल रात्री बारा वाजता’ या चित्रपटातील भूमिका पाहून अनेक महिला संतापल्या होत्या. एकदा कर त्यांना एका कार्यक्रमात पाहून महिला चपलेने मारायला आल्या होत्या. याबाबतचा किस्सा स्वत: अशोक शिंदे यांनी एका मुलाखतीत सांगितला होता.
नेमकं काय घडलं?
‘काल रात्री बारा वाजता’ या सिनेमात मी एका इनामदराचे काम केले होते. तो इनामदार खूप माजोरदा, उद्धट होता. अलका कुबल ही त्याची पत्नी होती. उषा नाईक मॅडम खरंतर मला सीनियर होत्या, पण त्या इतक्या फिट होत्या की माझ्या मॅचला त्या मॅच होत्या. सिनेमात मी त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांना माझ्या घरात उचलून आणून ठेवतो हा एक सीन आहे. ते बघून माझी बायको वेडी होते असा निगेटीव्ह रोल होता असे अशोक शिंदे म्हणाले.
बायका चिडल्या..
पुढे ते म्हणाले की, तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूजला एक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी मला बोलावले होते. त्यांनी दुपारचा शो हा खास महिलांसाठी ठेवला होता. मी छान गॉगल वैगरे लावून तेथे गेलो होतो. मला वाटलं माझं वेलकम होईल. तिथे तीन-चार गावरान बायका आल्या होत्या. त्या महिलांच्या हातात अक्षरश: चप्पल होती. त्यामधली एक बाई जोरात बोलली, हाच तो भाड्या! मला प्रचंड वाईट वाटलं. कारण समोरच मोहिते पाटील साहेब उभे होते. मी इकडे तिकडे बघू लागलो तेव्हा ती बाई पुन्हा बोलली की इथे तिथे बघू नको आम्ही तुलाच बोलतोय. तुला चपलेने मारलं पाहिजे.
