त्याला चप्पलेने मारायची वेळ आले; राजकीय व्यक्तीकडून मराठमोळ्या अभिनेत्याला त्रास? नेमकं प्रकरण काय?
Sanket Pathak: एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका राजकीय व्यक्तीविषयी बोलत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबा झाल्याची माहिती दिली होती. आता सध्या तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. संकेतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकेतने संताप व्यक्त केला आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
संकेतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो संतापला असून त्याला एका राजकीय व्यक्तीमुळे त्रास होत असल्याचे तो सांगत आहे. “याचा गेम मी चेंज करणार” असं म्हणत त्याने त्या व्यक्तीला ओपन चॅलेंज दिले आहे.
काय म्हणाला संकेत?
संकेतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडीओ हा कारमध्ये शूट केलेला आहे. व्हिडीओमध्ये तो बोलतो की, “राजकारणात माणूस कुठल्याही लेव्हलला असला तरी तो स्वार्थीच असतो. मी अशाच एका व्यक्तीबद्दल तुमच्याशी बोलतो आहे, कारण याने जे काही केलं ते अत्यंत चुकीचं आहे. आजपर्यंत मी कधीच कोणाबद्दल असं समोर येऊन काहीही बोललो नव्हतो, पण आता पाणी खरंच डोक्याच्या वरून गेलं आहे.”
View this post on Instagram
“अशा व्यक्तीला चपलेने मारायची वेळ आली आहे, कारण याची हीच लायकी आहे. याचं नाव आणि याने काय केलं हे मी सगळ्यांना सांगणार आहे, कारण आता मला फरक पडत नाही. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि याच्याच भाषेत सांगायचं तर आता याचा गेम मी चेंज करणार आहे, उपट काय उपटायचं ते,” असे संकेत म्हणाला.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
अभिनेता संकेत पाठकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना अक्षरश: धक्का बसला आहे. संकेत कधी इतक्या रागात दिसत नाही. त्याच्या सोशल मीडियावरही अशा प्रकारचे व्हिडीओ दिसलेले नाहीत. तो नेहमीच शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जातो. व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्की काय झालं आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कोणता राजकीय व्यक्ती आहे ज्याच्यामुळे संकेतला त्रास होत आहे, असा प्रश्न त्याला विचारला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
