‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवर भीषण आग; घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अभिनेत्री रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली आहे. या आगीत मालिकेचं सेट संपूर्ण जळून खाक झालं आहे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात आली.

मुंबईतील गोरेगावमधल्या फिल्म सिटीमध्ये आज (सोमवार) पहाटे 5 वाजताच्या सुमारास आग लागली होती. फिल्म सिटीमधील ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटला ही भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली असून कूलिंगचं काम सुरू आहे. या घटनेच्या वेळी सुदैवाने स्टुडिओमध्ये कोणताही कलाकार उपस्थित नव्हता, त्यामुळे कोणीही जखमी झालं नाही. परंतु या आगीत संपूर्ण सेट जळून राख झाला आहे. सेटजवळच असलेल्या स्टुडिओलाही आग लागली आहे. या स्टुडिओचा फक्त एक छोटासा भाग जळाला आहे. सध्या अग्निशमन दल आणि पोलिसांचं पथक ही आग कशी आणि का लागली याचा तपास करत आहेत. सकाळी 7 वाजता अनुपमा या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. त्याच्या अवघ्या दोन तासांपूर्वी ही आग लागली होती. या आगीत सेटचं बरंच नुकसान झालं आहे.
ज्यावेळी सेटवर ही आग लागली तेव्हा बरेच कामगार आणि क्रू मेंबर्स तिथे उपस्थित होते. शूटिंगसाठी पूर्वतयारी करण्यात ते सर्वजण व्यस्त होते. त्याचवेळी अचानक ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने कोणताही कर्मचारी किंवा क्रू मेंबर्स यात जखमी झाल्याचं वृत्त नाही. परंतु शूटिंगदरम्यान ही घटना घडली असती तर चिंतेचं कारण ठरलं असतं. कारण त्यावेळी सेटवर बरेच लोक उपस्थित असतात. या घटनेनंतर सेटवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
Massive Fire Breaks Out on the Set of ‘Anupamaa’ in Mumbai’s Film City – AICWA Demands High-Level Investigation and Accountability
Mumbai, 23rd June 2025 – A major fire broke out early this morning at 5:00 AM on the set of the popular television serial Anupamaa in Film City,… pic.twitter.com/KjxXGyM9mn
— All Indian Cine Workers Association (@AICWAOfficial) June 23, 2025
आगीच्या या घटनेनंतर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत सेटवरील निष्काळजीपणावरून ताशेरे ओढले होते. त्याचसोबत त्यांनी अत्यंत कडक शब्दांत निवेदन जारी केलं आहे. असोसिएशनने आगीच्या कारणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर मालिकेचे निर्माते आणि प्रसारक यांनी आगीची जबाबदारी घेतली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय. शूटिंगच्या ठिकाणी सुरक्षेचे सर्व उपाय सुनिश्चित करण्याबद्दलही त्यांनी सूचना दिल्या आहेत. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
त्यांनी फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबईच्या कामगार आयुक्तांना सुरक्षा नियमांची अंमलबजावणी न केल्याबद्दल दोषी ठरवत त्यांना तात्काळ निलंबित करण्याच मागणी केली आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि कथित संगनमतामुळे अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे हजारो कामगारांचा जीव धोक्यात घातला जातो, असा आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच निर्मात्यांनी किंवा वाहिनीने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी जाणूनबुजून आग लावली होती का, याचीही चौकशी करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.
