Medha Manjrekar : ते शब्द शेवटचे…नाना पाटेकरांसाठी मेधा मांजरेकरांची हृदयद्रावक पोस्ट
Medha Manjrekar On Nana Patekar : मेधा मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाना पाटेकर यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं असून कलाविश्वावर डोंगर कोसळला आहे. राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत नाना पाटेकरांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच आता मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनीही भावुक पोस्ट शेअर केली आहे. नाना पाटेकर आणि मेधा मांजरेकर यांनी ‘नटसम्राट‘ या सिनेमात एकत्र काम केलेलं. सिनेमामध्ये नाना, मेधा यांनी ‘सरकार‘ असं म्हणतात. खऱ्या आयुष्यातही नाना मेधा यांना ‘सरकार‘ म्हणायचे. तसेच 20 दिवसांपूर्वीच नाना पाटेकर यांनी मेधा यांना फोन केलेला.
मेधा मांजरेकर यांची भावुक पोस्ट
मेधा मांजरेकर यांनी नाना पाटेकरांसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ते आमचे ‘नाना’ होते…’नटसम्राट’मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्यांच्या सहवासातील तो अनुभव मी सदैव माझ्यासोबत जपून ठेवेन. नानांचा अभिनय पाहणं म्हणजे केवळ एका अभिनेत्याला पाहणं नव्हतं, त्यातून अभिनयकलेबद्दल, जीवनाबद्दल आणि माणसांबद्दल खूप काही शिकायला मिळायचं.’
‘पण मला एक उत्तम अभिनेता लक्षात राहिलाच पण त्याचबरोबर एक खरा माणूसही लक्षात राहिला आहे. ते मला ‘सरकार’ म्हणायचे. जेव्हा जेव्हा त्यांचा फोन यायचा, तेव्हा ते म्हणायचे, ‘सरकार, कशा आहात?’ आणि ती केवळ एक औपचारिकता नसायची, त्यांना खरोखरच माझी विचारपूस करायची असायची. माझ्या कर्करोगाशी सुरू असलेल्या लढाईच्या काळातही नाना मला फोन करून माझी विचारपूस करायचे. कोणतीही मोठी गोष्ट न करता, समोरच्याची काळजी घेण्याची त्यांची ती एक सुंदर पद्धत होती.’
‘त्यांनी मला 20 दिवसांपूर्वी फोन केलेला…आणि तेव्हाही, त्यांनी सर्वात आधी हेच विचारलं, ‘सरकार, कशा आहात?’ तेव्हा मला कल्पनाही नव्हती की ते शब्द शेवटचे ठरतील. लोक नानांना ‘नटसम्राट’ म्हणून लक्षात ठेवतील, एक असा असाधारण अभिनेता, ज्याचा आवाज, ज्याची अभिनयातील तीव्रता आणि प्रत्येक पात्रात त्यांनी ओतलेली प्रामाणिकपणाची भावना अविस्मरणीय होती.’
View this post on Instagram
‘मलाही त्या सर्व गोष्टींची आठवण राहीलच. पण मला त्या माणसाचीही आठवण राहील, ज्यांनी फोन उचलून अत्यंत साधेपणानं आणि आपुलकीनं विचारलं होतं, ‘सरकार, कशा आहात?’ नाना, तुम्ही मला अशा आठवणी दिल्या आहेत ज्या मी आयुष्यभर जपून ठेवेन…तुम्ही सदैव आमचे ‘नटसम्राट’च राहाल. ओम शांती.’ असं मेधा यांनी शेवटी म्हटलं आहे.
