
अभिनेते मुकुल देव यांचं शुक्रवारी वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं. मुकुल यांनी निधनापूर्वी अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. या चित्रपटात त्यांनी विंदू दारा सिंहच्या भावाची भूमिका साकारली आहे. शनिवारी मुकुल यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याच विंदूचाही समावेश होता. विंदू आणि मुकुल यांच्यात खूप चांगली मैत्री होती. मुकुल यांना पाणावलेल्या डोळ्यांनी विंदू यांनी निरोप दिला. परंतु त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना तो जे म्हणाला, त्यावरून नेटकरी चांगलंच ट्रोल करत आहेत. विंदूच्या प्रतिक्रियेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध कमेंट्स करत आहेत.
मुकुल देव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना विंदू माध्यमांसमोर त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत होता. याच कारणामुळे नेटकरी त्याच्यावर टीका करत आहेत. “माझा जणू अर्धा भागच निघून गेला आहे. टोनीचा टिटू आता राहिला नाही. सन ऑफ सरदारमध्ये आम्ही दोघांनी टोनी आणि टिटू या भावंडांच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘सन ऑफ सरदार 2’ या चित्रपटाचं शूटिंग तर संपलंय. आता तो येत्या 25 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तुम्ही सर्वजण त्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव करा”, असं विंदू यावेळी म्हणाला.
“तुम्ही हसून हसून वेडे व्हाल असा हा चित्रपट आहे. मुकुल इतक्या अचानकपणे आम्हाला सोडून गेलाय की काहीच समजत नाहीये. परंतु आमच्या सर्वांच्या मनात तो कायम राहील. त्याचं काम सदैव चाहत्यांच्या मनात राहील. सन ऑफ सरदारच्या दुसऱ्या भागात त्याने खूपच भारी काम केलंय”, असं त्याने पुढे म्हटलंय. त्यामुळे विंदूने मित्राच्या निधनाचा शोक व्यक्त केला की आपल्या चित्रपटाचं प्रमोशन केलं, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. ‘शोक व्यक्त करण्याची ही कोणती पद्धत आहे? चित्रपटाचं प्रमोशन करायला आलाय की श्रद्धांजली वाहायला आलाय’, अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
मुकुल देव हे गेल्या आठवडाभरापासून आयसीयूमध्ये दाखल होते. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मुकुल हे अभिनेते राहुल देव यांचे छोटे भाऊ आहेत. त्यांनी बॉलिवूडसोबतच मालिकांमध्येही काम केलंय.