दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का? कोर्टाचा सवाल
मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्याशी संबंधित लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येप्रकरणी सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर कोर्टाने दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का? हे पटवून द्या, असे आदेश दिले आहेत. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्याबरोबर याचिकाकर्त्यांचा हेतू काय? याबद्दल माहिती द्या, असेही कोर्टाने सांगितले आहे.
सर्व पुराव्यांची सखोल चौकशी करा, याचिकाकर्त्यांची मागणी
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरही आज सुनावणी पार पडली. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. 8 जून 2020 रोजी दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं. कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच 13 व 14 जून 2020 रोजीचं सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांमध्ये आसपासच्या परिसरात आदित्य ठाकरेंशी संबंधित संपूर्ण सीसीटिव्ही फुटेज तपासलं जावं, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांनी कोर्टात केली आहे.
सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व पुराव्यांची सखोल चौकशी व्हायला हवी, असेही याचिकाकर्ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंकडूनही हस्तक्षेप याचिका
भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतच्या आरोपांचीही सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका आदित्य ठाकरेंच्या विरोधात आहे. यानंतर या याचिकेवर आदित्य यांनी हस्तक्षेप घेत याचिका दाखल केली आहे. आज यावर एकत्र सुनावणी पार पडली.
आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी यावेळी कोर्टात बाजू मांडली. आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पाचबोला यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर, याचिकाकर्त्यांचे वकील निलेश ओझा यांनीही यावर प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अधारे यांनी हस्तक्षेप केला.
तुम्हाला हे आरोप करावेसे का वाटतात?
या याचिकेत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनेक तपास एजन्सी तपास करत आहेत. मग, तुम्हाला हे आरोप करावेसे का वाटतात? असा सवाल कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारला आहे. तर याचिकाकर्ते म्हणून आधी आमची बाजू ऐकावी, अशी आग्रही भूमिका याचिकाकर्त्यांचे वकिल यांनी केली. त्यावर मात्र आदित्य ठाकरे यांची भूमिका ऐकण्यास मुख्य न्यायमूर्ती आलोक अधारे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांची सहमती दर्शवली.