सैफ अली खानच्या हल्लेखोराला ‘या’ व्यक्तीने मदत केली,तपासासाठी मुंबई पोलीस थेट बंगालमध्ये
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लामने बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. तसेच काही दिवस तो कोलकाता येथे राहिला होता. त्यामुळे त्याला नक्की यामध्ये कोणी मदत केली किंवा त्याच्यासोबत या हल्ल्यात अजून कोणाचा हात आहे का? अशा अनेक गोष्टींच्या तपासासाठी मुंबई पोलीस थेट बंगालमध्ये पोहोचले आहेत.

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला मुंबई पोलिसांनी पकडले आहे. मात्र तपासात अनेक गोष्टी समोर येताना पाहायला मिळत आहेत. त्यातील एक महत्त्वाची माहिती म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी शरीफुल इस्लामने बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला.
काही दिवस तो कोलकाता येथे राहिला होता.त्यामुळे त्याला नक्की मदत कोणी केली किंवा त्याच्यासोबत या हल्ल्यात अजून कोणाचा हात आहे का? असेल अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मुंबई पोलीस शोधत आहेत.
हल्लेखोराला भारतात आणायला कोणी मदत केली
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला भारतात यायला कोणी मदत केली आहे का? किंवा त्याचे इतर साथीदार आहेत का? याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस थेट बंगालमध्ये पोहोचले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलीस कसून चौकशी करताना दिसत आहेत. त्यात पोलिसांना खुकुमोनी जहांगीर शेख नावाच्या व्यक्तीबद्दल काही माहिती मिळाली आहे. याच व्यक्तीच्या शोधातच मुंबई पोलीस पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहेत.
या व्यक्तीने आरोपींना सीमकार्ड दिल्याचा आरोप आहे. आरोपींकडून मुंबई पोलिसांनी जप्त केलेले सीमकार्ड खुकुमोनी जहांगीर शेख याच्या नावाने नोंदवले आहे. याच चौकशीसाठी पोलीस थेट बंगालमध्ये त्याच्या शोधात पोहोचले आहे.
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलला शुक्रवारी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याच्या कोठडीत आणखी सात दिवस वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत 29 जानेवारीपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिला.
सैफवर झालेला हल्ला
16 जानेवारीला पहाटे 2.30 वाजता सैफ अली खानवर हल्ला झाला होता. आरोपी शरीफुल हा चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसला होता. पण जेहाच्या खोलीत पोहोचताच त्याची आया जोरात किंचाळली. नानीचा आवाज ऐकून सैफ आला आणि त्यांच्यात बाचाबाची केली. यावेळी आरोपींनी अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले.
5 दिवस लीलावती रुग्णालयात सैफ उपचार घेत होता. त्याची एक सर्जरीही करण्यात आली. मात्र आता त्याची प्रकृती ठिक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. तसेच त्याला आता काही दिवस आराम करण्याचाही सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
सैफने आपल्या वक्तव्यात काय म्हटले आहे
सैफने पोलिसांना दिलेल्या जबाबात घटनेच्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, 16 जानेवारीच्या रात्री तो पत्नी करीनासोबत 11व्या मजल्यावर असलेल्या त्याच्या बेडरूममध्ये होता.
अचानक त्यांना जेहची नर्स एलियामा फिलिप हिच्या ओरडण्याचा आवाज आला. हे ऐकून तो ताबडतोब आपल्या मुलाच्या खोलीकडे धावला. त्याने हल्लेखोराला खोलीत पाहिले.
सैफने हल्लेखोराला पकडले अन्…
सैफने हल्लेखोराला पकडले.पण त्या झटापटीत हल्लेखोराने त्याच्या पाठीवर, मानेवर व इतर ठिकाणी चाकूने वार केले. सैफने कशीतरी सुटका करून हल्लेखोराला मागे ढकलले.
नर्सने मुलगा जेहला खोलीतून बाहेर काढले आणि हल्लेखोराला खोलीत बंद केले. या अपघातामुळे सैफ आणि त्याचे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले होते. दरम्यान या आरोपीची आणि या प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यासाठी मुंबई पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत.
