समंथाच्या चाहत्यांकडून सोभिताची ट्रोलिंग; अखेर नाग चैतन्य म्हणाला “माझ्या भूतकाळाशी..”
दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी गेल्या वर्षी लग्न केलं. या लग्नापूर्वी आणि आता लग्नानंतरही सोभिताला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्यावर नाग चैतन्य नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.

अभिनेता नाग चैतन्यने 2021 मध्ये समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. नाग चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे दोन गट पडले. एका गटाने नाग चैतन्यची बाजू घेतली, तर दुसऱ्या गटाने समंथाविषयी सहानुभूती व्यक्त केली. मात्र सोभितासोबतच्या नाग चैतन्यच्या नव्या नात्यामुळे या दोघांनाही प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लग्नापूर्वी समंथाच्या चाहत्यांनी सोभितावर बरीच टीका केली. किंबहुना आजसुद्धा तिला सोशल मीडियावर नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्य मोकळेपणे व्यक्त झाला.
नुकत्याच एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत नाग चैतन्य म्हणाला, “खरंतर मला तिच्याबद्दल वाईट वाटतं. कारण या सर्वांत तिची चूक काहीच नव्हती आणि जे काही तिला सहन करावं लागलं, त्यासाठी ती अजिबातच जबाबदार नव्हती. आम्हा दोघांची भेट अत्यंत सहज आणि सुंदररित्या झाली होती. सोशल मीडियावरील चॅटनंतर आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. हे नातं हळूहळू मजबूत होत गेलं. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, माझ्या भूतकाळाशी तिचा काहीच संबंध नाही. त्यामुळे मला या गोष्टीचा खूप राग येतो की तिला हे सगळं सहन करावं लागतंय.”




View this post on Instagram
यावेळी नाग चैतन्यने सोभिताच्या स्वभावाचं कौतुक केलं. “ज्याप्रकारे तिने सर्वकाही समजून घेतलं, त्याबद्दल मी तिचे आभार मानले पाहिजे. तिने खूप समजूतदारपणा दाखवला आणि यातून खूप सामंजस्यपणे पुढे आली. इतक्या नकारात्मकतेचा सामना करणं सोपं नाही. माझ्यासाठी ती खरी हिरो आहे”, अशा शब्दांत त्याने पत्नीची प्रशंसा केली.
नाग चैतन्य आणि सोभिता हे लग्नाआधी दोन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट करत होते. डेटिंगदरम्यान दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यावेळी दोघांनी कधीच प्रेमाची जाहीर कबुली दिली नव्हती. दोघांनी थेट साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नाविषयीची माहिती दिली. या दोघांच्या लग्नाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. नागार्जुन यांनी सोभिताला जेव्हा त्यांच्या घरी चहासाठी बोलावलं होतं, तेव्हाच नाग चैतन्यची तिच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. त्यामुळे सोभिता आणि नाग चैतन्यला एकत्र आणण्यात नागार्जुन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.