
भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज) शिखर परिषदेचं आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. 1 ते 4 मे पर्यंत या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात विविध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. पहिल्याच दिवशी शाहरुख खान, रजनीकांत यांसारख्या सेलिब्रिटींनी या परिषदेला हजेरी लावली. यावेळी ‘थलायवा’ म्हणून ओळखले जाणारे रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. मोदी हे फायटर आहेत, असं ते म्हणाले. न्यूज 9 ने WAVES Edition मध्ये ग्लोबल समिटचं आयोजन केलं आहे. जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित या शिखर परिषदेत ते बोलत होते.
“पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हा कार्यक्रम रद्द होईल असं अनेकांना वाटलं होतं. पण त्यांनी कलेचा कार्यक्रम रद्द केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक फायटर आहेत. या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. जागतिक पातळीवरील एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीलासोबत घेऊन हे काम सुरू आहे,” असं रजनीकांत म्हणाले.
वेव्हज शिखर परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (गुरुवार) मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालं. या परिषदेचं यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचं जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल. या ‘वेव्हज 2025’मध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, एव्हीजीसी-एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.
परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘लेजेंड्स अँड लेगेसीज: द स्टोरीज दॅट शेप्ड इंडियाज सोल’ या शीर्षकाची पॅनल चर्चा दुपारी 12.30 वाजता सुरू झाली. यात हेमा मालिनी, मिथुन चक्रवर्ती, रजनीकांत, मोहनलाल आणि चिरंजीवी यांनी सहभाग घेतला. तर या चर्चेचं सूत्रसंचालन अभिनेता अक्षय कुमारने केलं.
या पॅनल चर्चेव्यतिरिक्त या कार्यक्रमात संगीतकार एम. एम. किरवाणी, गायिका श्रेया घोषाल, शंकर महादेवन, सोनू निगम, केएस चित्रा आणि मंगली हे परफॉर्म करतील. त्यानंतर पंडित विश्व मोहन भट्ट, रोणू मजुमदार, ब्रिज नारायण आणि इतर दिग्गजांचेही परफॉर्मन्स आयोजित करण्यात आले आहेत.