Ramayana Movie : आदिनाथ कोठारेचा ‘रामायण’ चित्रपट सात भाषांमध्ये मग त्यात मराठी का नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचा पटण्यासारखा प्रश्न, थेट निर्मात्याला पत्र लिहिलं अन..
Ramayana Movie : सध्या सगळीकडे रणबीर कपूर आणि आदिनाथ कोठारेच्या रामायण चित्रपटाची चर्चा आहे. दिवाळीच्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटातील प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेय. आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक मुद्दा उपस्थित केलाय.

सध्या सगळीकडे रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची चर्चा आहे. नितीश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटाची जगभरातील कमाई 1000 कोटीच्या घरात पोहोचली आहे. सध्या सोशल मीडियावर, लोकांच्या चर्चांमध्ये ‘रामायण’ चित्रपटाबद्दल बरचं काही बोललं जातय. ‘रामायण’ चित्रपट थिएटरमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पण मराठी भाषेत हा चित्रपट आलेला नाही. मुंबईत आणि महाराष्ट्रात या चित्रपटाचे कमाईचे आकडे चांगले आहेत. पण मराठी भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. बाबासाहेब पाटील यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांकडे हा चित्रपट मराठी भाषेत डब करुन राज्यता थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करावा अशी मागणी केली आहे.
‘रामायण’ हे भारतातील एक प्रसिद्ध पौराणिक महाकाव्य आहे. मराठी भाषिक प्रेक्षकांनी त्यापासून का वंचित रहावं हा त्यांचा मुद्दा आहे. बाबासाहेब पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी निर्माते नमीत मल्होत्रा यांना पत्र लिहून मराठी भाषेत ‘रामायण’ चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे. मराठी भाषेला 1000 वर्षांचा साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मराठीला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा लाभला आहे, याकडे बाबासाहेब पाटील यांनी लक्ष वेधलं आहे. एका मोठ्या पौराणिक कथेवरील आधारित प्रकल्पातून मराठी भाषेला वगळणं हे दुर्देवी आहे. मराठी भाषा ज्या सन्मानासाठी पात्र आहे, ते नाकारण्यासारखं आहे.
पाच भाषा मग त्यात मराठी का नाही?
महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेत आपल्या मातृभाषेत हा चित्रपट पहायला मिळाला पाहिजे. चित्रपटांच्या बाजारपेठेचा विचार केला, तर त्यात महाराष्ट्र खूप पुढे आहे. देशातील सर्वात मोठी चित्रपटांची बाजारपेठ मुंबईत आहे. एकादिवसात कोट्यवधींचा गल्ला मुंबईत सारख्या शहरातून मिळतो. “कुठल्याही प्रादेशिक भाषेविरोधात आमची भूमिका नाहीय. पण मराठी भाषिक प्रेक्षकांना सुद्धा समानतेची वागणूक, समान आदर मिळाला पाहिजे” हे बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं. ‘रामायण’ चित्रपटासाठी विविध भाषांमध्ये प्रदर्शनाची रणनिती अवलंबण्यात आली आहे. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि अन्य भाषांमध्ये ‘रामायण’ चित्रपट डब करण्यात आला आहे. मग मराठी का नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.
