..म्हणून तो चोर सैफच्याच घरात शिरला; पोलीस चौकशीत खुलासा
अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत काही खुलासे केले आहेत. ते घर अभिनेता सैफ अली खानचंच होतं, हे माहीत नसल्याचा दावा आरोपीने केला आहे. त्याचप्रमाणे त्याने इमारतीत इतरही घरांमध्ये शिरण्याचा प्रयत्त केल्याचं स्पष्ट केलं.

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आपण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेतता सैफ अली खानवर हल्ला केल्याचं आरोपीला नंतर मीडियाद्वारे समजलं. त्याने इमारतीतील इतरही काही घरांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संपूर्ण बिल्डिंगमध्ये सैफच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता. याचाच फायदा घेत आरोपी सैफच्या घरात शिरला होता. पोलिसांच्या चौकशीत त्याने याबद्दलचा दावा केला. त्याचप्रमाणे सैफ अली खानच्या इमारतीत लावण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही बंद होते, असंही त्याने सांगितलं.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान शहजाद म्हणाला, “मी सैफ अली खानचं घर ओळखत नाही. सदगुरू शरण इमारतीत प्रवेश करताना मी इतर काही घरांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व घरं बंद होती. पण जेव्हा मी सैफच्या घराजवळ पोहोचलो, तेव्हा त्याच्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता. म्हणून मी आत शिरण्यात यशस्वी ठरलो.” सैफवरील हल्ल्याचं प्रकरण मीडियासमोर आल्यानंतर आरोपीला समजलं की तो ज्या घरात गेला होता, ते अभिनेता सैफ अली खानचं घर होतं.




मागच्या दरवाज्यातून सैफच्या घरात शिरल्यानंतर आरोपीने सैफचा छोटा मुलगा जहांगीरच्या खोलीस प्रवेश केला. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. यातील एक महिला कर्मचाऱ्याला त्याने आधी शांत राहण्यास सांगून धमकावलं होतं. तसंच एक कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा या सैफच्या लहान मुलाला उचलण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान आणि करीना कपूर दोघंही तिथे पोहोचले. त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या चाकून सैफवर हल्ला केला. तैमुरची आया गीता यादेखील मधे पडल्याने जमखी झाल्या होत्या. आरोपीने सैफवर सहा वार केले आणि तो पळून गेला होता. त्यानंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सैफची प्रकृती आता स्थिर असून त्याला आज डिस्चार्ज मिळणार आहे.