पाकिस्तानी अभिनेत्रीने दिला घरचा आहेर, इस्त्रोला शुभेच्छा देत म्हणाली, आम्हाला इथे जाण्यासाठी 3 दशक लागतील
चंद्रयान 3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर संपूर्ण भारतामध्ये एक उत्साहाचे वातावरण बघायला मिलाले. संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त करण्यात आला. जगभरातून भारताच्या शास्त्रज्ञांचे काैतुक हे केले जात आहे. चंद्रयान 3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे.

मुंबई : भारताने नुकताच एक मोठा इतिहास लिहिला आहे. भारताच्या चंद्रयान 3 (Chandrayaan 3) ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडिंग करत मोठा आणि नवा इतिहास रचला. विशेष म्हणजे चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा भारत हा जगातील पहिल्याच देश आहे. काल संपूर्ण जगाचे लक्ष हे चंद्रयान 3 च्या लॅंडिंगकडे होते. चंद्रयान 3 च्या यशस्वी लॅंडिंगनंतर भारतीयांनी मोठा जल्लोष साजरा केला. प्रत्येक भारतीयासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब नक्कीच आहे. देशातील प्रत्येक नागरिक हा चंद्रयान 3 च्या यशस्वी लॅंडिंगसाठी प्रार्थना करत होता.
बाॅलिवूडच्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरूख खान याने तर चक्क एक गाणे म्हणत चंद्रयान 3 च्या लॅंडिंगनंतर सर्वांना शुभेच्छा दिल्या. अनिल कपूर यांनी लाईव्ह प्रक्षेपण बघत आनंद व्यक्त केला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे काैतुक जगभरातून केले जात आहे.
इतकेच नाही तर चंद्रयान 3 च्या लॅंडिंगनंतर देशभरातील नागरिक रस्त्यावर येत आपला आनंद व्यक्त करताना दिसत होते. देशातील कानाकोपऱ्यातील चाैकांमध्ये लोक जमत भारत माती की जय, वंदे भारत…अशा प्रकारच्या घोषणा देत होते. संपूर्ण देशामध्ये मोठा जल्लोष बघायला मिळाला. जगातील अनेक देशांनी देखील भारताला शुभेच्छा दिल्या.
हे सर्व सुरू असताना आपला शेजारी देश पाकिस्तानमधूनही चंद्रयान 3 च्या लॅंडिंगनंतर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नाही तर तेथील सरकारला देखील घरचा आहेर दिला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी हिने भारताला शुभेच्छा देत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर सहर हिने ही पोस्ट केलीये.
पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी भारतासोबत असलेली दुश्मनी विसरून त्यांना शुभेच्छा देत आहे. आज भारत जिथे आहे तिथे पाकिस्तानला पोहचण्यासाठी 2 ते 3 दशक लागतील. दुर्भाग्य या गोष्टीचे आहे की, आज जिथे आम्ही आहोत त्याचे कारणीभूत देखील आम्हीच आहोत. आता सहर शिनवारी हिने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
