Ajay Devgn : पान मसाला जाहिरात प्रकरणात मोठी अपडेट, अजय देवगणची मुंबई हायकोर्टात धाव, तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Tukaram Mundhe On Pan Masala Ad Controversy : पान मसाला जाहिरात वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एफडीएच्या नोटीसविरोधात अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांचाही या प्रकरणात समावेश आहे.

विमल पान मसाल्याच्या जाहिरातीवरून बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ चर्चेत आले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तिघांनाही नोटीस बजावली होती. या नोटिशीला तिन्ही अभिनेत्यांनी आपापलं उत्तर दिलं आहे. दरम्यान, अभिनेता अजय देवगण याने FDA च्या नोटिशीला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
विमल जाहिरात प्रकरण नेमकं काय?
बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकार विविध उत्पादनांच्या जाहिराती करताना दिसतात. यामध्ये पान मसाला ब्रँडच्या जाहिरातींचाही समावेश आहे. अभिनेता अजय देवगण हा विमल पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे यापूर्वीही चर्चेत आला होता. त्यानंतर शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांची नावेही या जाहिरातीशी संबंधित चर्चेत आली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र FDA ने तिन्ही अभिनेत्यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीच्या माध्यमातून प्रशासनानं त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यानुसार तिघांनीही आपली बाजू मांडत उत्तर दाखल केलं आहे.
अजय देवगणची हायकोर्टात धाव
FDA च्या नोटिशीनंतर अभिनेते टायगर श्रॉफ, शाहरुख खान आणि अजय देवगण या तिघांनीही आपलं उत्तर दाखल केलं आहे. तसेच अजय देवगण यानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून याचिका दाखल केली असल्याचं FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. नोटिशीविरोधात त्यानं याचिका दाखल केल्यानं या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळालं आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजय देवगणप्रमाणेच शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांनाही FDA कडून नोटीस बजावण्यात आली होती. दोन्ही अभिनेत्यांनीही प्रशासनाकडे आपलं उत्तर सादर केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं, तसेच प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, विमलच्या जाहिरातीमुळे यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. २०२२ मध्ये, विमलच्या जाहिरातीत दिसल्याबद्दल अक्षय कुमारला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यानं माफी मागितली आणि त्या जाहिरातीशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. आता, अजय देवगणनं उच्च न्यायालयात धाव घेतल्यानं, या प्रकरणातील कायदेशीर लढाई आणखी तीव्र होऊ शकते.
