Imtiaz Jaleel: इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी, कार्यालयातील त्या पत्राने मोठी खळबळ, पत्रात नेमंक काय म्हटलं?
Imtiaz Jaleel Death Threat: इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या कार्यालयात धमकीचं पत्र आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या कार्यालयात धमकीचे पत्र आढळून आले आहे. या पत्रात त्यांना कोणत्याही क्षणी जीवे मारले जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज जलील यांनी हे पत्र पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात हे धमकीचे पत्र आढळले. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची सुपारी अहिल्यानगर येथील एका तरुणाला देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर संबंधित तरुणाचे नाव आणि पत्ताही पत्रात नमूद असल्याची माहिती समोर आली आहे. ‘तुम्हाला कोणत्याही क्षणी जीवे मारले जाईल,’ असा मजकूर या पत्रात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, या पत्रातील दाव्यांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी ते पोलिसांकडे दिले आहे. या पत्राची सत्यता तपासावी, तसेच त्यात उल्लेख करण्यात आलेल्या अहिल्यानगरमधील व्यक्तीची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस आता पत्रामागील नेमके कारण, त्यातील माहितीची विश्वासार्हता आणि संबंधित व्यक्तीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास करत आहेत.
या धमकीबाबत बोलताना इम्तियाज जलील यांनी अशा प्रकारच्या धमक्या यापूर्वीही अनेकदा मिळाल्याचे सांगितले. मात्र, अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. धमकीचे पत्र पोलिसांकडे दिले आहे. त्याची योग्य ती चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. या घटनेच्या निमित्ताने इम्तियाज जलील यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबतही चिंता व्यक्त केली. शहरात गावठी कट्टे आणि बंदुका खुलेआम आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भररस्त्यात हत्या होण्यासारख्या घटना घडत असल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.
