शाहरुख खानच्या बर्थडेसाठी ‘किंग’च्या मेकर्सची मोठी तयारी, 2 नोव्हेंबरला काय होणार ?
KING : शाहरुख खानचा बहुचर्चित 'किंग' चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. त्यासाठी मेकर्सचं मोठं प्लानिंग सुरू आहे. 2 नोव्हेंबरला शाहरुखचा वाढदिवस असून त्या दिवशीच काही मोठं घडू शकतं.

King Shah Rukh Khan Film : या वर्षी फिल्म इंडस्ट्रीत सर्वात जास्त चर्चा आहे ती बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी ‘किंग’ चित्रपटाची. जेव्हा या प्रोजेक्टची घोषणा झाली, तेव्हापासून या फिल्मशी रिलेटेड सर्व छोट्या-मोठ्या अपडेट्सची चाहते आतुरतेने वाट पहात असतात. या फिल्मचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाहरुखची प्रमुख भूमिका असलेल्या या फिल्मद्वारे त्याच लेक सुहाना खान ही मोठ्या पडद्यावर डेब्यू करणार आहे. त्यातच आता या फिल्मबद्दल एक मोठी अपडेट देखील समोर आली आहे. मेकर्सनी फिल्मच्या प्रमोशनसाठी जय्यत तयारी केली आहे.
अलीकडेच ‘बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड’वर प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमधून ‘किंग’ चित्रपटाच्या प्रमोशनबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनल जर्नीची सुरुवात एका खास अंदाजात होणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटातील पहिलं टीझर साँग ‘डॅडी कूल’ 2 नोव्हेंबर रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने सोशल मीडियावर आतापासूनच उत्सुकता वाढली आहे.
करीना कपूरसह संपूर्ण टीमचा दिसणार जलवा !
या गाण्याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, टीझर साँगमध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खानही दिसणार असल्याची चर्चा आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळू शकते. एवढंच नाही, तर या गाण्यात केवळ मुख्य कलाकारच नव्हे, तर संपूर्ण टीम आणि अनेक डान्सर्सही सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे गाणं एका भव्य पार्टी ट्रॅकच्या स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
‘किंग’च्या प्रमोशनला मिळणार नवी सुरुवात !
सुहाना खानचं पदार्पण आणि शाहरुख खान-करीना कपूर यांची जोडी यामुळे ‘किंग’ हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत आहे. सध्या चित्रपटातील गाणी आणि इतर शूटिंगशी संबंधित कामं वेगाने सुरू असल्याची माहिती आहे. अशातच 2 नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता असलेलं ‘डॅडी कूल’ हे टीझर साँग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. एकंदरीत, या गाण्याबाबतच्या चर्चेमुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना ‘किंग’ची ही खास झलक पाहायला मिळणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
