मतदान न करणाऱ्यांवर भडकले परेश रावल; म्हणाले “अशा लोकांचा टॅक्स..”

अभिनेते परेश रावल यांनी मतदान न करणाऱ्यांवर राग व्यक्त केला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असं मत मांडलं.

मतदान न करणाऱ्यांवर भडकले परेश रावल; म्हणाले अशा लोकांचा टॅक्स..
परेश रावल
Image Credit source: Instagram
| Updated on: May 20, 2024 | 4:21 PM

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत असून अभिनेते परेश रावल यांनीसुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 68 वर्षीय परेश रावल यांनी मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देताना इतरांनाही हा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नव्हे तर जे लोक मतदान करणार नाहीत, त्यांच्याविरोधात कठोर पाऊलं उचलली पाहिजेत, असंही ते म्हणाले. परेश रावल यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रातील दहा मतदारसंघांसह नाशिक, धुळे आणि दिंडोरी या जागांवर मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई महानगर क्षेत्रात कमी मतदान झालं होतं.

माध्यमांशी बोलताना परेश रावल म्हणाले, “जे लोक मतदान करत नाहीत, त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांचा टॅक्स वाढवला पाहिजे किंवा असं काही ना काही त्यांच्यासाठी असलं पाहिजे. तुम्ही म्हणता की सरकार हे काम करत नाही, ते काम करत नाही. जर तुम्ही आज मतदान केलं नाही तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल. ज्या लोकांनी मतदान केलं नाही, ते जबाबदार असतील. त्यांच्यासाठी सरकार जबाबदार नाही.”

परेश रावल हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. ट्विटरवर त्यांनी लिहिलं होतं, ‘वाईट राजकीय नेते जन्माला येत नाहीत, तर ते बनवले जातात. ते अशा लोकांकडून बनवले जातात, जे मतदानाच्या दिवशी पिकनिकला, फिरायला जातात.’ मतदानाच्या दिवशी अनेकांना सुट्टी असल्याने काहीजण मतदानाचा हक्क बजावण्याऐवजी फिरायला निघून जातात. त्यांनाच परेश रावल यांनी फटकारलं होतं.

परेश रावल यांच्याशिवाय बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रिटींनी मतदान केलं आहे. दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, धर्मेंद्र, हेमा मालिनी, शाहरुख खान, आमिर खान आणि त्याची पूर्व पत्नी किरण राव, कियारा अडवाणी, करीना कपूर, सैफ अली खान यांसह इतरही बऱ्याच सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.