अमेरिकन लष्कराच्या बराकीत ‘या’ अभिनेत्रीचे फोटो झळकले, ठरली पहिली बोल्ड अभिनेत्री
आपल्या बोल्ड फोटोशूटने एका भारतीय अभिनेत्रीने जगात खळबळ माजवली होती. तिच्या वागण्यात चार्मनेस आणि बिनधास्तपणा होता. अमेरिकेची सेक्स सिम्बॉल जेन रसेल या अभिनेत्रीलाही तिने मागे टाकलं होतं. इतकचं नव्हे तर तिची पिन अप गर्लची जागाही या अभिनेत्रीने घेतली.

नवी दिल्ली | 13 फेब्रुवारी 2024 : आजच्या काळात बॉलिवूड अभिनेत्रींसाठी बोल्ड फोटोशूट करणं ही काही मोठी गोष्ट राहिली नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात सोशल हँडलवरून बोल्ड फोटोशूट शेअर करून अगदी कमी काळात जगभरात प्रसिद्ध होतात. पण, ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता. जेव्हा मुलींसाठी चित्रपटात काम करणे ही मोठी गोष्ट मानली जात होती. त्याकाळात आपल्या बोल्ड फोटोशूटने एका भारतीय अभिनेत्रीने जगात खळबळ माजवली होती. तिच्या वागण्यात चार्मनेस आणि बिनधास्तपणा होता. अमेरिकेची सेक्स सिम्बॉल जेन रसेल या अभिनेत्रीलाही तिने मागे टाकलं होतं. इतकचं नव्हे तर तिची पिन अप गर्लची जागाही या अभिनेत्रीने घेतली. त्या काळच्या सिने मासिकांवरची ती हॉटस्टार गर्ल होती.
तत्कालीन ब्रिटिशकालीन भारत आणि आताचा पाकिस्तानमधील पंजाब येथे 25 डिसेंबर 1926 रोजी जुबैदा उल हक हिचा जन्म झाला. वडील मियां एहसान उल हक हे बिकानेरचे मुख्य न्यायाधीश होते. त्यामुळे तिचे पालनपोषण राजस्थानमधील बिकानेर येथे झाले. अलिगढ विद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. जुबैदा हिचा मोठा भाऊ मसरुल हक अभिनेता होण्यासाठी 1930 मध्ये मुंबईत आला. त्याने बंगाली अभिनेत्री प्रोतिमा दासगुप्ता हिच्यासोबत लग्न केले.
जुबेदा हिला आपल्या वहिनीच्या झगमगत्या दुनियेने प्रभावित केले. ती जेव्हा वहिनीला भेटायला जायची तेव्हा तिला खूप भूमिकांची ऑफर यायची. अशीच एक ऑफर त्यांना शशधर मुखर्जी आणि देविका राणी यांच्याकडून आली. प्रभातच्या ’चांद’ सिनेमासाठी बेगम पारा यांना प्रेम अदीब यांच्यासोबत नायिकेची भूमिका मिळाली. चित्रपट जगतात त्यांचा प्रवेश झाला आणि तिने नाव बदलले. जुबैदा उल हक ही अभिनेत्री बेगम पारा झाली.
पन्नासच्या दशकात रूपेरी पडद्यावर सोज्वळ नायिकांची चलती होती. भारतीय संस्कृतीला अनुकूल अशा संपूर्ण वस्त्रांमध्ये भारतीय नायिका भूमिका करत होत्या. अशावेळी बेगम पारा नावाचं वादळ या दुनियेत येऊन घोंगावलं. ऐटबाज आणि नखरेल अदांनी त्यांनी साऱ्या जगाला घायाळ केलं. फॅशन, अदा, बोल्ड नेस यात ती मागे राहिली नाही. बॉलीवूडमध्ये त्याकाळी तिला मिसफिट म्हणत.
1951 साली बेगम पारा हिने जगप्रसिध्द ’लाईफ’ मॅगझिनसाठी ‘बोल्ड’ फोटो शूट केले. पाश्चात्य पोषाखात ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या फॅशनेबल अदेने नवा ट्रेंड सुरु झाला. तिची वेषभूषा, केशभूषा हिची भुरळ तरूणींनाही पडली. तर, स्विमिंग कॉस्चुम्समधल्या फोटोने तरूणांची झोप उडाली. ’लाईफ’ मॅगझिनने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. कारण, अमेरिकेन सैनिक त्यावेळी बेगम पारा हिचा फोटो आपल्या पाकिटात ठेवत. त्यांच्या बराकीतही तिचे फोटो लावलेले असत. तिच्या मादक अदांनी अमेरिकन सैनिक खुश होत. इतकी प्रचंड मोठी लोकप्रियता बेगम पारा हिला लाभली होती.
अभिनेता शेख मुख्तार याच्यासोबत ती ‘उस्ताद पेड्रो’ चित्रपटात चमकली. ही जोडी लोकांना खूपच आवडली. यानंतर तिने अनेक चित्रपट केले पण अभिनेत्री म्हणून ती स्वत:ची ओळख निर्माण करू शकली नाही. 1958 साली अभिनेता दिलीपकुमार यांचा भाऊ नासिर खान यांच्यासोबत तिने लग्न केले आणि लग्नानंतर तिने चित्रपटातून संन्यास घेतला. 1974 साली नासिरखान यांचे निधन झाले. त्यानंतर काही काळ पाकीस्तानात जावून त्या पुन्हा भारतात आल्या.
नासीरखान आणि बेगम पारा यांना 3 मुले झाली. त्यापैकी एक म्हणजे बॉलीवूड अभिनेता अयुब खान. दीर दिलीपकुमार यांच्याशी बेगम पारा यांचे अजिबात जमले नाही. ती अनेकदा त्यांना म्हणायची, ‘तो दिलीप कुमार असेल तर मी ही बेगम पारा आहे.’ राज कपूर आणि मधुबाला याच्या ‘नीलकमल’मध्ये त्यांनी भूमिका केली. सोहनी महिवाल, मेहंदी, नया घर, लैला मजनू या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या.
