Pooja Batra: मी पोहोचण्याआधीच घेतला अखेरचा श्वास.. वडिलांच्या निधनानंतर पूजा बत्राची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
Pooja Batra: अभिनेत्री पूजा बत्राचे वडील कर्नल रवि बत्रा यांचं 20 नोव्हेंबर रोजी निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Pooja Batra’s father: अभिनेत्री पूजा बत्राच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीचे वडील आणि भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी कर्नल रवि बत्रा यांचं निधन झालं आहे. 20 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाची बातमी अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत दिली. या पोस्टमध्ये तिने वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला असून, त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही केली नव्हती, असं म्हटलं आहे. पूजा बत्राच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. पूजा बत्राने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कुटुंबीय आणि मित्रांसोबतचे आनंदाचे क्षणही पाहायला मिळतात. या फोटोंसोबत तिने लिहिलं की, 20 नोव्हेंबर रोजी तिने आपल्या वडिलांना गमावलं. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
वडिलांच्या अचानक जाण्यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचं तिने म्हटलं आहे. त्यांचा आवाज आजही कानात घुमतो आणि त्यांचं हसू कायम मनात राहील, अशा भावना तिने व्यक्त केल्या. पूजा बत्राने वडिलांना आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार असल्याचं म्हटलं आहे. तिच्या संपूर्ण जगाचा केंद्रबिंदू तेच होते. त्यांनी नेहमीच तिची आणि कुटुंबाची काळजी घेतली. त्यांच्या प्रेमळ स्वभावाची, विनोदबुद्धीची आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची आठवणही तिने पोस्टमधून सांगितली. वडिलांनी आईला दिलेला आदर, त्यांचं गाणं, प्रत्येक प्रसंगी आनंदी राहण्याची वृत्ती आणि दैनंदिन आयुष्यात दिलेलं मार्गदर्शन या गोष्टी कायम स्मरणात राहतील, असं पूजा म्हणाली. हा आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि अंधकारमय काळ असल्याचंही तिने नमूद केलं.
पहा पोस्ट-
View this post on Instagram
पूजा बत्राने वडिलांच्या लष्करी कारकिर्दीचाही अभिमानाने उल्लेख केला. कर्नल रवि बत्रा यांनी दोन युद्धांमध्ये सहभाग घेतला होता आणि अभिमानाने देशाची सेवा केली होती. ते एक उत्तम अधिकारी आणि कुटुंबाची काळजी घेणारे वडील होते, अशा शब्दांत तिने त्यांना आदरांजली वाहिली.
पूजा बत्रा 1993 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. 1997 मध्ये अनिल कपूरसोबतच्या ‘विरासत’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘हसीना मान जाएगी’, ‘नायक : द रिअल हिरो’, ‘कहीं प्यार ना हो जाए’ यांसारख्या चित्रपटांत ती दिसली. आता वडिलांच्या निधनामुळे अभिनेत्रीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तिच्या या कठीण काळात चाहते आणि मनोरंजनविश्वातील अनेकजण तिला धीर देत आहेत.
