माझ्या आयुष्यातील देवमाणूस… सिद्धार्थ जाधवची महेश मांजरेकरांसाठी खास पोस्ट, म्हणाला तुमचा प्रत्येक शब्द
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील उस्मान खिल्लारीची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ जाधवने महेश मांजरेकरांसाठी एक भावनिक पोस्ट केली आहे.

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला गेल्या दोन दिवसांपासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढतात अशी संकल्पना या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. आता या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ जाधवने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधवने उस्मान खिल्लारी हे पात्र साकारलं आहे. या चित्रपटातील सिद्धार्थचा लूक हा अंगावर काटा आणणारा आहे. त्याचा हा लूक पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. त्यातच आता सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने महेश मांजरेकरांचे कौतुक केले आहे.
सिद्धार्थ जाधवची पोस्ट
महेश सर तुमच्यासाठी काय लिहावं हेच कळत नाहीये. तुम्ही केवळ एक दिग्दर्शक नाही, तर माझ्या आयुष्यातील ‘देवमाणूस’ आहात. तुमच्यासोबत काम करताना एक ‘अभिनेता’ म्हणून सिद्ध करण्याची संधी देता. ‘दे धक्का’’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘लालबाग परळ’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘कुटुंब’, ते आजच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’पर्यंत… तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळेच मी माझ्या कामातून वेगवेगळ्या भूमिका साकारू शकलो.
तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी उस्मान खिल्लारी सारख्या एका आव्हानात्मक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्या भूमिकेला आणि सिनेमाला आज खूप प्रेम मिळतंय. सर, तुमचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक निर्णय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. Love you sir!!! महेश मांजरेकर… तुमचाच…सिद्धार्थ जाधव, अशी पोस्ट सिद्धार्थने केली आहे.
View this post on Instagram
चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
सिद्धार्थ जाधवच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह चाहत्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांना इमोजी शेअर करत सिद्धार्थचे आणि त्याच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. दरम्यान या चित्रपटात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री आणि सयाजी शिंदे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
