पीरियड्समध्ये ‘या’ अभिनेत्रीने दिला रोमँटिक सीन, बदलण्यासाठी नव्हते कपडे, पण जेव्हा…
इंडस्ट्रीमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीला पीरियड्समध्ये करावा लागला होता रोमँटिक सीन.पावसातील सीनंतर बदलण्यासाठी नव्हते जवळ कपडे. कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूड असो किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत कधीही समोर न आलेल्या घटना सध्या सोशल मीडियावर समोर येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या विचित्र वागणूक आणि घटनांबाबत खुलासा केला होता. मात्र, अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.
दरम्यान, चित्रपटसृष्टीत यश मिळवणं सोपं नसतं हे अनेक सेलिब्रिटी वेळोवेळी सांगत आले आहेत. विशेषतः महिला कलाकारांना शूटिंगदरम्यान विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. अशाच एका कठीण अनुभवाबद्दल मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पार्वती थिरुवोथुनेअलीकडेच खुलासा केला आहे.
‘हॉटरफ्लाय’ या प्लॅटफॉर्मवरील एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत पार्वतीने सांगितलं की, तिला पीरियड्सच्या काळात अभिनेता धनुषसोबत रोमँटिक सीन शूट करावा लागला होता. हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक ठरला. तिने सांगितलं की, 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘मरियान’च्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला.
पार्वती म्हणाली, ‘शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मला पाण्यात भिजत असताना हिरोसोबत रोमँटिक सीन करायचा होता. सीनदरम्यान माझ्यावर सतत पाणी टाकलं जात होतं. तेव्हा मला जाणवलं की, माझ्याकडे बदलण्यासाठी अतिरिक्त कपडेच नाहीत.’ या परिस्थितीत तिने दिग्दर्शकांकडे जाऊन कपडे बदलण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी मागितली. मात्र, ती परवानगी नाकारण्यात आली.
पीरियड्सवर काय म्हणाली अभिनेत्री?
यानंतर पार्वतीने शेवटी दिग्दर्शकांना आपण पीरियड्समध्ये असल्याचं सांगितलं. हे ऐकून दिग्दर्शकही क्षणभर गोंधळून गेला आणि नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी, हे त्यांना कळलं नाही असंही तिने सांगितलं. या मुलाखतीदरम्यान पार्वतीने समाजातील पीरियड्सभोवती असलेल्या गोष्टींवर भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या घरातसुद्धा अशावेळी मानसिकतेचा सामना करावा लागला. पीरियड्सबद्दल त्यांना आधी काहीच माहिती दिली नव्हती. त्या काळात त्यांना घरात एका कोपऱ्यात बसावं लागायचं, धुतलेले कपडे स्पर्श करण्यासही मनाई होती.
‘मरियान’ या तमिळ चित्रपटात पार्वती थिरुवोथू आणि धनुष प्रमुख भूमिकेत होते. पार्वतींच्या या अनुभवामुळे चित्रपटसृष्टीतील महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
