इतका पुळका असेल तर..; SC च्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या श्वानप्रेमींवर भडकला दिग्दर्शक

भटक्या श्वानांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनेक श्वानप्रेमींकडून विरोध केला जात आहे. यात बरेच सेलिब्रिटीसुद्धा आहेत. आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी अशा श्वानप्रेमींना सुनावलं आहे. भटक्या कुत्र्यांविषयी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

इतका पुळका असेल तर..; SC च्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या श्वानप्रेमींवर भडकला दिग्दर्शक
Ram Gopal Verma on stray dogs
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 17, 2025 | 1:34 PM

दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील सर्व भटके श्वान हटवून त्यांना आश्रयस्थानी ठेवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाला दिल्यापासून अनेक सेलिब्रिटींनी या निर्णयाचा निषेध केला आहे. परिस्थिती हाताळण्याचा हा योग्य मार्ग नाही, असं अनेकांचं मत आहे. त्यावर आता प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. ‘इथे भटक्या श्वानांकडून लोकांना चावलं जात असताना, मारलं जात असताना श्वानप्रेमी मात्र दुसरीकडे त्यांच्या हक्कांबद्दल ट्विट करण्यात व्यस्त आहेत’, असं त्यांनी लिहिलंय.

राम गोपाल वर्मा यांनी त्यांचे मुद्दे सविस्तर मांडले आहेत. त्यात त्यांनी लिहिलंय, ‘तुम्ही तुमच्या आलिशान घरांमध्ये पाळीव प्राण्यांवर प्रेम करू शकता. पण भटक्या कुत्र्यांमुळे बळी पडलेल्यांना आणि त्यांच्या प्रियजनांना करूणा दाखवण्याबाबत उपदेश देणं असंवेदनशील आहे. श्रीमंत लोक हायब्रीड श्वान पाळतात. गरीब लोकांना मात्र भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. श्वानप्रेमी या भेदाबद्दल कधीच बोलत नाहीत. जर एखादा माणूस कोणाची हत्या करत असेल, तर तो खुनी असतो. जर कुत्र्याने कोणाचा जीव घेतला, तर तुम्ही त्याला अपघात म्हणता. अशा अर्थाने प्राण्यांप्रमाणे मारणाऱ्या लोकांना अपघात म्हणता येईल का?’

‘तुम्ही श्वानांसाठी रडता, पण मेलेल्या माणसांसाठी रडत नाही. सहानुभूतीसुद्धा इतकी निवडक असू शकते, हे मला कधीच माहीत नव्हतं. भटक्या कुत्र्यांना मारू नका, असं श्वानप्रेमींनी म्हणण्याऐवजी तुम्ही त्यांना रस्त्यावरून काढून सर्वांना दत्तक का घेत नाही? कारण ते ‘लो ब्रीड’, घाणेरडे, रोगप्रवण असतात म्हणून तुम्हाला तुमच्या प्रियजनांना धोका निर्माण करायचा नाही? न्यायाशिवाय करुणा म्हणजे करुणा नाही. आम्ही म्हणतो तेच खरं अशाच गुंतलेली ही क्रूरता आहे. एक आई तिच्या डोळ्यांसमोर मुलाला कुत्र्यांकडून चावा घेतल्याचं आणि त्याने मरताना पाहते. या घटनेसाठी तुम्ही एखादा हॅशटॅग का तयार करत नाही? फक्त श्वानच नाही, तर कदाचित सर्व प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे. पण ते माणसाच्या आयुष्याच्या किंमतीवर असू शकत का’, असे सवाल राम गोपाल वर्मा यांनी केले आहेत. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी श्वानप्रेमींसाठी भटक्या कुत्र्यांबद्दल काही उपायसुद्धा सुचवले आहेत.