राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास; नेमकं काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वीच्या प्रकरणी त्यांना न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान राम गोपाल वर्मा हे कोर्टात हजर नव्हते.

चेक बाऊन्सप्रकरणी मुंबईतील एका न्यायालयाने बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या ‘सिंडिकेट’ या नव्या चित्रपटाची घोषणा होण्याच्या एक दिवस आधी न्यायालयाकडून हा निर्णय आला. गेल्या सात वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. अखेर मंगळवारी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने हा निर्णय दिला. मात्र हा निकाल ऐकण्यासाठी राम गोपाल वर्मा हे न्यायालयात हजर नव्हते. “निकालाच्या दिवशी आरोपी गैरहजर राहिल्याने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावं आणि संबंधित पोलीस ठाण्यातून अटक करण्यात यावी”, असा आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला. राम गोपाल वर्मा यांना त्यांच्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे, जो नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 138 अंतर्गत येतो.
न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांत तक्रारदाराला 372,219 रुपयांची भरपाई देण्याचे निर्देशही दिले आहेत. नुकसान भरपाई न दिल्यास त्यांना आणखी तीन महिने तुरुंगवास भोगावा लागेल. हे प्रकरण 2018 मधील आहे. महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत श्री नावाच्या कंपनीद्वारे याची सुरुवात झाली होती. हे प्रकरण राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या फर्मशी संबंधित आहे. या कंपनीअंतर्गत त्यांनी ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारखे चित्रपट बनवले होते. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. त्यातच कोविड महामारीदरम्यान ही कंपनी आर्थिक संकटात सापडली होती. यामुळे त्यांना त्यांचं कार्यालयसुद्धा विकावं लागलं होतं.




या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांना न्यायालयाने जून 2022 मध्ये पाच हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. “फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 428 अंतर्गत कोणत्याही सेटऑफचा प्रश्न उद्भवत नाही. कारण आरोपीने खटल्यादरम्यान कोठडीत कोणताही वेळ घालवला नाही”, असं दंडाधिकारी वायपी पुजारी यांनी शिक्षा सुनावताना सांगितलं. राम गोपाव वर्मा हे हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 1989 मध्ये त्यांनी ‘सिवा’ या तेलुगू क्राइम थ्रिलर चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.