
अभिनेता रणवीर सिंहचा आगामी ‘धुरंधर’ हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाची शूटिंग लडाखमध्ये सुरू असून अनेक क्रू मेंबर्सना विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. लेहमधल्या रुग्णालयात युनिटमधील 100 हून अधिक सदस्य दाखल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. “अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून बॉलिवूड चित्रपटाच्या 100 हून अधिक कामगारांना रविवारी संध्याकाळी उशिरा लेहमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय”, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
या चित्रपटाच्या युनिटमधील कर्मचारी शूटिंगमध्ये व्यस्त असताना त्यांच्यापैकी अनेकांना अचानक तीव्र पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास जाणूव लागला. त्यानंतर त्यांना ताबडतोब लेहमधील सजल नारबू मेमोरियल (एसएनएम) रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तपासानंतर डॉक्टरांनी हे प्रकरण सामूहिक विषबाधेचं असल्याचं सांगितलं आहे.
विषबाधेची घटना घडण्यापूर्वी तिथे जवळपास 600 लोकांनी जेवण केलं होतं, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. “विषबाधेमागील कारण शोधण्यासाठी आणि त्याच्या सविस्तर विश्लेषणासाठी अन्नाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत”, असंही अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तर रुग्णालयाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
“आम्ही रुग्णांच्या गर्दीचं प्रभावीपणे व्यवस्थापन केलं आहे. गर्दीने भरलेल्या आपत्कालीन कक्षाचं नियमन करण्यासाठी आणि भीतीचं वातावरण टाळण्यासाठी पोलिसांनीही हस्तक्षेप केला”, असं एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितलं. तर उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आवश्यक उपचार घेतल्यानंतर त्यापैकी बहुतेकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
या विषबाधेमागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलीस अधिकारी अन्नाच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. तर दुसरीकडे या घटनेमुळे लेहसारख्या संवेदनशील प्रदेशात इतक्या मोठ्या प्रमाणात चित्रपटांचे शूटिंग होत असताना सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. याप्रकरणी तपास सुरू असतानाच युनिट सदस्यांनी कोणत्या प्रकारचं अन्न आणि पाणी घेतलं होतं, याबद्दलही चौकशी केली जात आहे. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक कोण होते, आजारी पडलेल्यांमध्ये बॉलिवूडमधील कोणी कलाकार होतं का, याचीही नेमकी माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी ‘धुरंधर’ची शूटिंग सुरू होती.