कॅन्सर, डेंग्यू की आणखी काही..; रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनावर अनेक प्रश्न उपस्थित
Influencer Prathamesh Kadam Death: प्रसिद्ध मराठी कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन झालं. प्रथमेशचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Influencer Prathamesh Kadam Death: आपल्या आईसोबत रील्स बनवून कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा प्रसिद्ध मराठी कंटेंट क्रिएटर आणि रील स्टार प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. अवघ्या 26 व्या वर्षी प्रथमेशने आपले प्राण गमावले आहेत. त्याच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीयांसह नेटकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. प्रथमेशच्या निधनाचं वृत्त त्याचा अत्यंत जवळचा मित्र आणि कंटेंट क्रिएटर तन्मय पाटेकरने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश खूप आजारी होता. याच आजारपणातून त्याचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. परंतु त्याला नेमकं काय झालं होतं, याबद्दल असंख्य प्रश्न विचारले जात आहेत.
निधनाच्या कारणाबाबत संभ्रम
प्रथमेशच्या निधनाच्या वृत्ताने जितकं चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणलंय, त्यासोबत तितकेच सवालसुद्धा उपस्थित झाले आहेत. त्याच्या कुटुंबीयांनी, जवळच्या मित्रपरिवाराने अद्याप त्याच्या निधनामागच्या कारणाचा खुलासा केलेला नाही. परंतु सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये काही युजर दावा करत आहेत की प्रथमेशला कॅन्सर होता आणि त्याच्याच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे काही चाहते म्हणत आहेत की त्याला डेंग्यू झाला होता आणि गेल्या महिनाभरापासून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. प्रथमेशच्या निधनावर प्रसिद्ध गायक संजू राठोडनेही शोक व्यक्त केला आहे. अखेर हे सर्व अचानक असं कसं झालं, असा प्रश्न त्याने विचारला आहे.
View this post on Instagram
प्रथमेश कदमची ओळख फक्त एका इन्फ्लुएन्सरपुरतीच मर्यादीत नव्हती, तर तो त्याच्या आईसोबतच्या नात्यामुळेही ओळखला जायचा. गेल्या वर्षीच प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर त्याने त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. सोबतच तो आईचीही काळजी घेत होता. मायलेकाची ही जोडी कॉमेडी आणि भावनिक व्हिडीओ बनवत नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली होती. मराठी प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांमध्ये ही जोडी प्रसिद्ध होती. प्रथमेशच्या इन्स्टाग्रामवर 186K फॉलोअर्स असून युट्यूबवरही त्याच्या सबस्क्राइबर्सचा आकडा मोठा आहे. वयाच्या 26 व्या वर्षी कारकीर्द भरारी घेत असताना प्रथमेशच्या आयुष्याला लागलेला पूर्णविराम खरोखरच वेदनादायी आहे.
