Sagarika Ghatge : राजघराण्याची लेक, राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळली, बॉलिवूडमध्येही गाजली; धर्माची भिंत ओलांडून मुस्लिम क्रिकेटपटूशी थाटला संसार, कोण आहे ती?
Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत, ज्यांनी मोजक्याच चित्रपटांत काम करूनही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. ही अभिनेत्री राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळलेली खेळाडू असून तिचा संबंध कोल्हापूरच्या राजघराण्याशीही आहे.

बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत, ज्यांनी मोजक्याच चित्रपटांत काम करूनही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. अभिनेत्री सागरिका घाटगे ही त्यापैकीच एक. शाहरुख खानच्या ‘चक दे! इंडिया’ चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि प्रीती सभरवाल या भूमिकेमुळे ती लोकप्रिय झाली. मात्र, सागरिका केवळ अभिनेत्री नाही, तर ती राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळलेली खेळाडू असून तिचा संबंध कोल्हापूरच्या राजघराण्याशीही आहे. भारतीय क्रिकेटपटू झहीर खानसोबतच्या तिच्या प्रेमकहाणीचीही एक खास गोष्ट आहे.
कोल्हापूरच्या राजघराण्याशी सागरिकाचं नातं
सागरिका घाटगेचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. तिचे वडील विजय सिंह घाटगे हे कागलच्या माजी राजघराण्याशी संबंधित आहेत. सागरिकाची आजी सीताराजे घाटगे या इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तिसरे यांच्या कन्या होत्या. त्यामुळे सागरिकाचं नातं कोल्हापूर आणि इंदूरच्या राजघराण्यांशी जोडलं गेलं आहे. सागरिका आठ वर्षांची होईपर्यंत कोल्हापुरातच राहिली. त्यानंतर ती शिक्षणासाठी राजस्थानमधील अजमेर येथे गेली. तिनं मेयो कॉलेज गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सागरिका राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळायची. शाळेत असताना तिला खेळासोबतच नाटक आणि अभिनयाचीही आवड होती.
‘चक दे! इंडिया’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण
2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘चक दे! इंडिया’ या चित्रपटातून सागरिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं प्रीती सभरवाल या हॉकीपटूची भूमिका साकारली होती. ती स्वतः हॉकी खेळाडू असल्यामुळे या भूमिकेशी तिचं खास नातं जुळलं होतं. या चित्रपटानंतर तिनं ‘फॉक्स’, ‘मिले ना मिले हम’, ‘रश’ आणि ‘इरादा’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं. 2013 मध्ये अतुल कुलकर्णीसोबत ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटातही ती झळकली. 2015 मध्ये तिनं ‘खतरों के खिलाडी 6’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता आणि ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.
झहीर खानसोबतची लव्हस्टोरी
सागरिका आणि भारतीय क्रिकेटपटू झहीर खान यांची ओळख मित्रांच्या माध्यमातून झाली. दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. मात्र, सुरुवातीला त्यांनी आपल्या नात्याबद्दल सार्वजनिकपणे काहीही सांगितलं नव्हतं. 2016 मध्ये युवराज सिंह आणि हेजल कीच यांच्या लग्नसोहळ्यात सागरिका आणि झहीर एकत्र दिसले. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं. अखेर 2017 मध्ये दोघांनी आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. एप्रिल 2017 मध्ये झहीरनं सागरिकासोबतचा फोटो शेअर करत साखरपुड्याची घोषणा केली. या फोटोसोबत ‘Partners for life’ असं कॅप्शनही दिलं होतं.
View this post on Instagram
आंतरधर्मीय लग्नाबद्दल सागरिकानं काय सांगितलं होतं?
झहीर खान मुस्लिम कुटुंबातून, तर सागरिका मराठी हिंदू कुटुंबातून येते. त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल आंतरधर्मीय विवाहाचीही चर्चा झाली होती. 2025 मध्ये एका मुलाखतीत सागरिकानं याबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं. तिच्या मते, धर्मापेक्षा आयुष्यभर साथ देणारी योग्य व्यक्ती मिळणं तिच्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं. तिनं सांगितलं की, दोन्ही कुटुंबांमध्ये या विषयावर चर्चा झाली होती, मात्र तिच्या आई-वडिलांनी नात्याला विरोध केला नाही. झहीर पहिल्यांदा तिच्या वडिलांना भेटला, तेव्हापासून दोघांमध्ये चांगलं नातं निर्माण झालं.
साध्या पद्धतीनं केलं लग्न, 2025 मध्ये आई-बाबा झाले
सागरिका आणि झहीर यांनी 23 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबईत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर जवळच्या मित्रांसाठी खास पार्टी आयोजित केली होती. 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये त्यांचा भव्य रिसेप्शन सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. लग्नानंतरही सागरिका आणि झहीर यांनी आपलं वैयक्तिक आयुष्य तुलनेनं खासगी ठेवलं. 16 एप्रिल 2025 रोजी या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यांनी मुलाचं नाव फतेहसिंह खान असं ठेवलं.
