सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद अन्..

अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र कोर्टात नेताना पोलिसांची गाडी मधेच बंद पडली. तेव्हा काही पोलिसांनी गाडीला धक्का देऊन ती चालू करण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद अन्..
सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 29, 2025 | 3:25 PM

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्यात वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला आज पोलिसांनी कोर्टात हजर केलं. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला वांद्रे पोलीस कोर्टात घेऊन जात होते. मात्र अचानक मधेच पोलिसांची गाडी बंद पडली. यानंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी शरीफुलला पोलीस त्यांच्या गाडीतून वांद्रे कोर्टात घेऊन जात असताना पोलीस ठाण्याच्या 100 मीटर अंतरावरच गाडी बंद पडली. काही पोलिसांनी गाडीला धक्का देऊन ती चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातही त्यांना यश मिळालं नाही. अखेर आरोपी शरीफुलला पोलिसांनी लगेचच दुसऱ्या गाडीत हलवलं आणि त्यातून त्याला कोर्टात नेण्यात आलं.

शरीफुलला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे शरीफुलच्या पोलीस कोठडीच्या वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायाधीशांनी ही मागणी फेटाळली. “तपास पूर्ण झाला आहे. आता पोलीस कोठडीची गरज नाही. तपासात काही नवं समोर आल्यास बीएनएसएस कायद्यानुसार नंतर पोलीस कोठडीची मागणी करता येईल”, असं न्यायाधीश म्हणाले.

त्याचप्रमाणे शरीफुलकडून जप्त करण्यात आलेलं शस्त्र पोलिसांनी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (FSL) तपासणीसाठी पाठवलं आहे. . “आरोपी अत्यंत हुशार आहे. गुन्हा करण्याआधी त्याने रेकी केली होती”, असं सांगत पोलिसांनी शरीफुलच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. शरीफुलची बाजू मांडणारे वकील संदिर शेरखाने म्हणाले, “कोणतंही नवीन कारण न दिल्याने वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली नाही. पुढे जर योग्य कारण दिलं तर पुन्हा कोठडी मिळू शकेल. एफआयआरमध्ये हेक्सा ब्लेडचा उल्लेख होता. मात्र पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. योग्य ती कारणं नव्हती, म्हणून पोलीस कोठडी देण्यात आली नाही. पोलिसांच्या थिअरीमध्ये अनेक विरोधाभास आहेत.”

16 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता एक चोर सैफच्या घरात शिरला होता. त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत चोराने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार खोलवर झाले होते. यानंतर सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडा रुतला होता, तोही काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.