सैफवरील हल्ला प्रकरणात करीनाच्या भावाची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला “हे सर्व खूपच गुंतागुंतीचं..”
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी आता करीना कपूरच्या चुलत भावाने प्रतिक्रिया दिली आहे. हे संपूर्ण प्रकरण गोंधळात टाकणारं आणि गुंतागुंतीचं असल्याचं त्याने म्हटलंय. झहान कपूर हा करीनाचा चुलत भाऊ आहे.

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच राहत्या घरात चाकूहल्ला झाल्यानंतर अनेक कलाकारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत या घटनेवर विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. अशातच करीना कपूरचा चुलत भाऊ झहान कपूरने सैफवरील हल्ल्याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता मुंबईतील वांद्रे इथल्या सैफच्या घरात एक चोर शिरला होता. त्याने सैफवर चाकूने सहा वार केले असून त्यापैकी दोन वार गंभीर होते. यानंतर लिलावती रुग्णालयात सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
या धक्कादायक घटनेबद्दल झहान म्हणाला, “जेव्हा अशी एखादी घटना घडते, तेव्हा प्रचंड अस्वस्थता जाणवते. ही घटना घडल्यापासून आम्ही कुटुंबीय सतत त्याचाच विचार करत आहोत. हे प्रचंड विचलित करणारं आहे. फक्त अस्वस्थच नाही तर हे सर्व खूप घाबरवणारंही आहे. या परिस्थितीचा सामना कसा करायचा, ते समजत नाही. यातली चांगली बाब म्हणजे सैफ सुरक्षित आहे आणि तो लवकर बरा होतोय. अर्थातच या घटनेनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मला वाटत नाही की कोणीही या घटनेला समजू शकेल की असं का घडलं, त्यामागे काय कारण होतं? हे सर्व खूपच गोंधळात टाकणारं आणि गुंतागुंतीचं आहे.”
सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेकांनी त्याच्या रिकव्हरीबद्दल प्रश्न उपस्थित केले. सहा तास सर्जरी झाल्यानंतर सैफ इतक्या लवकर बरा कसा झाला, असा प्रश्न काहींनी विचारला होता. त्याबद्दल बोलताना झहान पुढे म्हणाला, “मला त्या चर्चांच्या आगीत आणखी तेल ओतायचं नाहीये. मला यातलं काहीच माहीत नाही. माझ्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे तो सुरक्षित आहे आणि पटकन बरा होतोय. त्यांनी त्यांच्या मनातूनही या घटनेची भीती लवकरात लवकर काढून टाकावी अशी माझी इच्छा आहे.” 16 जानेवारीलच्या घटनेनंतर सैफला पाच दिवसांनी 21 जानेवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.




16 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता एक चोर सैफच्या घरात शिरला होता. त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत चोराने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार खोलवर झाले होते. यानंतर सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडा रुतला होता, तोही काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. गंभीर वार झाल्यानंतर सैफ पाच दिवसांत इतका फिट कसा दिसू शकतो, असे प्रश्न काहींनी उपस्थित केले.