
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानचा ‘दबंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील गाणी तुफान गाजली होती. त्यातील ‘मुन्नी बदनाम हुई’ हा आयटम साँग तर प्रत्येक पार्ट्यांमध्ये वाजवला जात होता. अरबाज खानची पूर्व पत्नी आणि सलमानची पूर्व वहिनी मलायका अरोरावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘दबंग’चा दिग्दर्शक अभिनव कश्यपने या गाण्याबाबत मोठा खुलासा केला. सुरुवातीला सलमान आणि अरबाज मलायकाच्या आयटम साँगच्या विरोधात होते. नंतर मलायकानेच त्यांचं मन वळवलं, असं त्याने सांगितलं.
माझ्या पत्नीला ‘आयटम गर्ल’चा टॅग मिळू नये, यावर अरबाज खान ठाम होता, असं अभिनव म्हणाला. “त्याच्या पत्नीची प्रतिमा आयटम गर्ल अशी होऊ नये, याबाबत अरबाज फार काळजी घेत होता. अरबाज आणि सलमान, जरी काहीही म्हणत असेल तरी, ते खऱ्या आयुष्यात संकुचित मनोवृत्तीचे, रुढीवादी मुस्लीम आहेत. गाण्यातील कपड्यांवरून मलायका आणि सलमान यांच्यातही मतभेद होते. मलायकाने तोकडे कपडे घालू नये, अशी दोघा भावांची इच्छा होती. त्यामुळे ते तिला आयटम साँग करू देत नव्हते”, असं त्याने पुढे सांगितलं.
अखेर मलायकानेच सलमान आणि अरबाजला समजावलं. “मलायका ही अत्यंत सक्षम आणि स्वतंत्र विचारांची आहे. ती तिचे निर्णय स्वत: घेते. त्यामुळे जेव्हा तिला आयटम साँगची ऑफर मिळाली, तेव्हा तिने होकार दिला होता. अर्थात नंतर अरबाजचं मन वळवण्यासाठी तिला थोडा वेळ लागला. त्या गाण्यात काहीच अश्लील नाही, फक्त डान्स आहे आणि गाण्यात सर्व कुटुंबातीलच लोक आहेत, मग तू कशाला इतका घाबरतोय, असं ती त्याला म्हणाली. त्या गाण्याने नंतर सर्व रेकॉर्ड्स मोडले होते”, असं कश्यपने स्पष्ट केलं.
‘मुन्नी बदनाम हुईं’ या गाण्यात आधी सलमान नव्हताच, परंतु गाण्याची क्षमता पाहून नंतर त्याने भाग घेण्याबद्दल आग्रह धरल्याचाही खुलासा दिग्दर्शकाने केला. सोनू सूद आणि मलायका यांच्यासोबत सलमानला घेण्यासाठी पुन्हा टीमला काम करावं लागलं होतं.
अरबाज आणि मलायकाने 1998 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2002 मध्ये मलायकाने मुलगा अरहानला जन्म दिला. लग्नाच्या 18 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज 2016 मध्ये विभक्त झाले. 2017 मध्ये त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं. तर मलायका सिंगल आहे.