
Katrina Kaif Pregnant : अभिनेत्री कतरिना कैफने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. लग्नाच्या चार वर्षांनंतर ती गरोदर असून कौशल कुटुंबात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे. पती विकी कौशलसोबतचा खास फोटो शेअर करत तिने ही गोड बातमी दिली. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट पहायला मिळाला. विकी आणि कतरिनाच्या या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच अभिनेता सलमान खानचीही एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सलमानने कतरिना आणि विकीला शुभेच्छा दिल्या आहेत. ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा होत्या. अखेर या दोघांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर सलमानच्या नावाने एक पोस्ट समोर आली. सलमानने कतरिना-विकीचा फोटो शेअर करत त्यांना इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्याचं यामध्ये पहायला मिळालं. परंतु जेव्हा नेटकऱ्यांनी सलमानच्या अधिकृत अकाऊंटवर जाऊन पोस्ट पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती पोस्ट दिसलीच नाही. यावरून त्याने ती पोस्ट डिलिट केल्याचा अंदाज लावला. परंतु सलमानच्या या व्हायरल पोस्टमागचं सत्य वेगळंच आहे.
सध्या AI चा जमाना असल्याने कोणचाही, कोणताही फोटो अगदी सहज हवा तसा एडिट करू शकतो. सलमानच्या या पोस्टच्या बाबतीतही असंच काहीसं आहे. सलमानने कतरिना आणि विकीला शुभेच्छा दिल्याच नाहीत. त्याची ही संपूर्ण पोस्ट फेक म्हणजेच बनावट आहे. सलमान आणि कतरिनाचं जुनं नातं पाहता काही नेटकऱ्यांनी अशी पोस्ट एडिट करून व्हायरल केली आहे. कतरिनाला सलमाननेच बॉलिवूड इंडस्ट्रीत लाँच केल्याचं म्हटलं जातं. हे दोघं एकेकाळी एकमेकांना डेट करत होते. परंतु काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. कतरिनाने 2021 मध्ये विकी कौशलशी लग्न केलं. कतरिना ही विकीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे.