भगवा पट्टा, आतमध्ये राम मंदिर.. सलमानच्या हातातील घड्याळ पाहून चिडले मौलाना
सलमान खानच्या हातातील घडाळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मौलाना यांनी त्याच्या या घड्याळ्यावरून आक्षेप घेतला आहे. सलमानच्या घडाळ्यावर राम जन्मभूमीचं चित्र पहायला मिळतंय. तर त्याच्या या घड्याळ्याचा पट्टा भगव्या रंगाचा आहे.

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या कपड्यांची, केसांची, घडाळ्यांची स्टाइल नेहमीच चर्चेत असते. सलमानचा ‘बीईंग ह्युमन’ हा कपड्यांचा ब्रँड चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेच. आता त्याने स्पेशल एडिशन घड्याळसुद्धा लाँच केलं आहे. ‘सिकंदर’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने त्याच्या हातात हे घड्याळ घातलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमानने त्याच्या हातातील घड्याळ दाखवत खास फोटोशूट केलंय. त्याच्या हातातील या घडाळ्याच्या मॉडेलने सर्वांचंच लक्ष वेधलंय. कारण त्याच्या डाएलवर राम जन्मभूमी बनवण्यात आली आहे. त्याचसोबत इतरही डिझायनिंग आहे. या घड्याळाचा पट्टा भगव्या रंगाचा आहे. अनेकांना सलमानचा हा राम जन्मभूमी स्पेशल एडिशन वॉच खूपच आवडला आहे. परंतु त्यावरून काहींनी आक्षेपसुद्धा घेतला आहे. सलमानने घातलेलं राम जन्मभूमीचं हे घड्याळ हे ‘हराम’ (इस्लाममध्ये नाकारलं गेलेलं) आहे, असं धर्मगुरू आणि अखिल भारतीय मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेल्वी म्हणाले.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना मौलाना म्हणाले, “भारतातील प्रसिद्ध मुस्लीम व्यक्तीमत्त्व सलमान खान याने राम मंदिराचं समर्थन करणारं ‘राम एडिशन’चं घड्याळ घातलं होतं. मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे सलमानसह इतर कोणत्याही मुस्लीम व्यक्तीसाठी ‘हराम’ (परवानगी नसणारं) आहे. इस्लामविरोधी संस्थांना किंवा धार्मिक चिन्हांना प्रोत्साहन देण्याची परवानगी त्यांना नाही.” मौलाना यांनी सलमानला त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करण्याची, इस्लामिक कायद्याचा (शरिया) आदर करण्याची आणि त्यांच्या तत्त्वांचं पालन करण्याचा सल्ला दिला.
View this post on Instagram
“अशी कृती अन्याय्य आणि निषिद्ध आहे. त्याने माफी मागावी (तौबा) आणि अशी चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मी सलमानला सल्ला देतो की त्याने इस्लामिक कायद्याचा (शरिया) आदर करावा आणि तत्त्वांचं पालन करावं”, असं ते पुढे म्हणाले. राम जन्मभूमी असलेलं घड्याळ घालणं किंवा त्याचं प्रमोशन करणं म्हणजे इस्लामी नसलेल्या धार्मिक प्रतीकांना समर्थन देण्यासारखं आहे आणि हे अजिबात मान्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सलमानने घातलेल्या या घडाळ्याची किंमत तब्बल 34 लाख रुपये असल्याचं समजतंय.
