घटस्फोटाबद्दलचा ‘हा’ चित्रपट पाहून समंथालाही राहावलं नाही; म्हणाली ‘प्रेम, राग, असुरक्षितता..’
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकताच ओटीटीवर एक चित्रपट पाहिला. या चित्रपटाची कथा घटस्फोटावर आधारित आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तिने इन्स्टा स्टोरीवर लगेच एक पोस्ट लिहिली आहे. समंथाच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतंच दुसरं लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. ‘द फॅमिली मॅन’चा दिग्दर्शक राज निदिमोरूशी तिने लग्नगाठ बांधली आहे. याआधी समंथाचं लग्न दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी झालं होतं. परंतु लग्नाच्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले. समंथा आणि नाग चैतन्यचं नातं, घटस्फोट या गोष्टी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. अशातच तिने एका घटस्फोटावर आधारित चित्रपटाबाबत लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा चित्रपट आहे इम्रान हाश्मी आणि यामी गौतमी यांचा ‘हक’. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होतोय. नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणाऱ्या ‘हक’वर फक्त प्रेक्षकांकडूनच नाही तर सेलिब्रिटींकडूनही कौतुकाचा वर्षाव होतोय. याआधी आलिया भट्ट आणि निर्माता करण जोहर यांनीसुद्धा ‘हक’चं कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती.
‘हक’ हा चित्रपट आणि त्यातील यामीची दमदार कामगिरी या दोन्ही गोष्टी हृदयाला भिडणाऱ्या असल्याचं तिने म्हटलंय. समंथाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये याविषयीची पोस्ट लिहिली आहे. ‘हक’ची कथा खोल, संवेदनशील आणि कोणतेही पूर्वग्रह न बाळगणारी आहे. यामीने तिची भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे, असं तिने लिहिलंय. समंथाने यामीच्या अभिनयाचं वर्णन शब्दांपलीकडे आहे, असं केलं.
तिने पुढे लिहिलं, ‘चित्रपट पाहिल्यानंतर मला लगेच ही पोस्ट लिहावी लागली. कारण मला मिळालेली सुंदर भावना हरवून जाऊ द्यायची नव्हती. अशा कथा दुर्मिळ असतात. इतका खोल, इतक्या थरांनी व्यापलेला आणि निर्णय किंवा पक्षपातीपणापासून पूर्णपणे मुक्त असा.. आणि जेव्हा इतकी हुशार अभिनेत्री ती कथा जिवंत करते, तेव्हा ते आणखी खास ठरतं. यामी गौतम.. तुझ्या अभिनयाने मला अशाप्रकारे प्रभावित केलंय की मी त्याचं शब्दांत वर्णन करू शकत नाही. प्रेम, राग, ताकद, असुरक्षितता, आशा.. या सर्व भावना मला एकाच वेळी जाणवल्या.’
समंथाची पोस्ट-

समंथाने तिच्या पोस्टमध्ये दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचंही कौतुक केलं आहे. ‘तुमच्या लेखनाने एक विशेष छाप सोडली आहे. हा चित्रपट सिनेमाची खरी शक्ती दाखवतो. हा सिनेमा आहे. हेच कारण आहे की आपण जे करतो, ते करत राहतो. हेच कारण आहे की आम्ही प्रत्येक चढउतारांमध्ये हाच मार्च निवडत राहतो’, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
नुकतंच निर्माता, दिग्दर्शक करण जोहरनेही यामी गौतमचं कौतुक केलं. शाजिया बानोची कथा आणि तिचा विजय इतका भावूक होता की चित्रपट संपल्यानंतर मी रडलो आणि काही क्षण नि:शब्द झालो, असं तो म्हणाला. ‘हक’ हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू न शकल्याची तक्रार त्याने बोलून दाखवली. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या चित्रपटाने इतकं प्रभावित केल्याची भावना त्याने व्यक्त केली.