एक हिट दिला की वेडे होतात, दम असेल तर..; संजय दत्तचं कोणाला थेट चॅलेंज?

अभिनेता संजय दत्तने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एपिसोडमध्ये हे चॅलेंज दिलं आहे. एक हिट चित्रपट दिला की वेडे होतात, असं तो म्हणाला. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सुनील शेट्टीसुद्धा संजूबाबासोबत होता.

एक हिट दिला की वेडे होतात, दम असेल तर..; संजय दत्तचं कोणाला थेट चॅलेंज?
फाईल फोटो
| Updated on: Sep 08, 2025 | 3:08 PM

अभिनेता संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये नुकतीच हजेरी लावली. या एपिसोडमध्ये दोघांनी कॉमेडियन कपिल शर्मासोबत मनसोक्त गप्पा मारल्या, त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले आणि चित्रपटसृष्टीविषयी आपली मनमोकळी मतंसुद्धा मांडली. माझ्या करिअरमध्ये मला संजयकडून अनेकदा प्रेरणा मिळाल्याचं, सुनील शेट्टीने सांगितलं. तर कपिल शर्माने अर्चना पुरण सिंह आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्यातील तिखटगोड वादावरून फिरकी घेत संजय आणि सुनील यांना प्रश्न विचारला. बॉलिवूडमध्ये आता मल्टी-स्टारर (अनेक कलाकारांचा) चित्रपट का बनत नाहीत, असा सवाल त्याने केला. त्यावर संजय आणि सुनीलने असं उत्तर दिलं, जे ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

संजय दत्त म्हणाला, “मला असं वाटतं की आताच्या कलाकारांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे. मी करिअरच्या शिखरावर असताना दिलीप साहब, संजीव कुमार आणि शम्मी काका यांच्यासोबतही काम केलं. आमच्यात जराही असुरक्षितता नव्हती. किंबहुना मला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. जर अण्णाने (सुनील शेट्टी) माझे डायलॉग म्हटले आणि मी त्याचे डायलॉग म्हटले तरी काही समस्या नव्हती. कारण चित्रपट चांगला व्हावा अशीच आमची इच्छा असायची.” यावर सुनील शेट्टीनेही होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, “एकमेकांसाठी मनात कौतुकाची भावना होती.”

“मी अभिनयाचं कोणतंच प्रशिक्षण घेतलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मी संजय दत्त, जॅकी श्रॉफ, गोविंदा आणि सनी देओल यांच्याकडे पाहूनच शिकत गेलो. ‘बलवान’ या चित्रपटानंतर मला लाकडी अभिनेता असं म्हटलं गेलं होतं. माझं अभिनय अत्यंत वाईट होतं आणि मी पुन्हा उडिपीला जाऊन तिथे रेस्टॉरंटमध्ये काम करावं, असं अनेकजण म्हणाले होते. मला वाईट वाटलं. परंतु मला याची जाणीव होती की मी अभिनयाचं प्रशिक्षणच घेतलं नाही. यश मिळाल्यानंतर मला अभिनय करण्याबाबत चिंता जाणवायची. पण त्याकाळी आमच्यात कोणतीच असुरक्षिततेची भावना नव्हती, म्हणून मी त्यांच्याकडून शिकू शकलो. आताच्या कलाकारांमध्ये असा विचार नसतो. व्हर्चुअल विश्वाने त्यांना खूप घाबरवून सोडलंय”, असं मत सुनील शेट्टीने मांडलं.

“आपल्यात असं कोणतं वैर आहे की आपण दुसऱ्याचे चित्रपट चालू नयेत अशी मनोमन अपेक्षा करतो? सर्वांचे चित्रपट चालले पाहिजेत. तुम्ही जितके नम्र असाल तितकं तुम्ही पुढे जाऊ शकाल. फक्त एक चित्रपट हिट झाला की नवीन कलाकार वेडे होतात. परंतु मी त्यांना सांगतो की तुम्ही या इंडस्ट्रीत 40 वर्षे टिकून दाखवा”, असं थेट आव्हानच संजूबाबाने नवोदित कलाकारांना दिलं.