
Trishala Dutt Cryptic Post: अभिनेता संजय दत्त याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची मुलगी त्रिशाला दत्त हिने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सर्वत्र संजय आणि त्रिशाला यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर त्रिशाला हिच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्ट पाहिल्यानंतर संजय दत्त आणि त्रिशाला यांच्या नात्यात दुरावा आला आहे का? असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. कुटुंबाची प्रतिमा जपण्यापेक्षा मानसिक आरोग्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे…’ असं त्रिशाला पोस्टमध्ये म्हणाली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत त्रिशाला म्हणाली, ‘प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात स्वतःची जागा निर्माण करेल… असं प्रत्येक वेळेस होणार नाही. तुमचं रक्ताचं नातं असेल तरी ते शक्य होणार नाही… कधीकधी सर्वात जास्त थकवणारे, अमान्य करणारे आणि नाकारणारे लोक आपलं स्वतःचं कुटुंब कधी होतात कळत नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शांतता हवी असते. कुटुंबाची प्रतिमा जपण्यापेक्षा तुमच्या मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष द्या…’
पोस्टमध्ये त्रिशाला पुढे म्हणाली, ‘सतत तुमच्यासोबत गैरवर्तन आणि दुखावणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा… मग त्या व्यक्तीने तुमचा सांभाळ केला असेल तरी काहीही हरकत नाही… त्या व्यक्तीला तुमच्या जवळ देखील येऊ देऊ नका…जेव्हा आई – वडिलांना जगात कुटुंब कसं आहे यापेक्षा ते कसं दिसतं याची जास्त काळजी असते, तेव्हा ती एक समस्या असते.’ असं देखील त्रिशाला म्हणाली.
संजय दत्त आणि त्रिशाला यांच्या नात्यामध्ये दुरावा आहे… असं अनेकदा समोर आलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. पण काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये प्रेमळ नातं पाहायला मिळालं… त्रिशाला हिने वडिलांच्या 66 व्या वाढदिवशी वडिलांना शुभेच्छा देखील दिला. पण आता क्रिप्टिक पोस्टनंतर पुन्हा त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
त्रिशाला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्याची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांची पहिली मुलही त्रिशाला झगमगत्या विश्वापासून दूर एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्रिशाला सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. त्रिशाला अमेरिकेत तिच्या आजी – आजोबांसोबत राहते.