Sara Gurpal : स्कर्ट लाल झालेला, मला वाटलं कॅन्सर…प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला पहिल्या मासिक पाळीचा धक्कादायक अनुभव
Actress On First Period : प्रसिद्ध अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत पहिल्या मासिक पाळीचा अनुभव सांगितला आहे.

मनोरंजनविश्वातील कलाकार अनेकदा त्यांच्या आयुष्यातील खासगी आणि भावनिक अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पंजाबी गायिका आणि अभिनेत्री सारा गुरपाल हिनंदेखील नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रसंगाचा खुलासा केला आहे. वयात येताना आलेल्या पहिल्या मासिक पाळीचा अनुभव तिनं सांगितला. मासिक पाळीबद्दल कोणतीही माहिती नसल्यामुळे पहिल्यांदा रक्तस्राव झाल्यावर आपल्याला कॅन्सर झाला असावा, अशी भीती तिला वाटली होती.
अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
सारानं ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत हा अनुभव सांगितला. हरियाणामध्ये वाढलेल्या साराच्या घरात मासिक पाळीविषयी मोकळेपणानं चर्चा होत नव्हती. तिची आईदेखील फारशी शिकलेली नव्हती. त्यामुळे मासिक पाळी म्हणजे नेमकं काय, या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल साराला आधीपासून कोणतीही माहिती नव्हती. सारानं सांगितलं की, शाळेत असताना वर्गातच तिला पहिल्यांदा मासिक पाळी आली. अचानक रक्तस्राव सुरू झाल्यामुळे ती प्रचंड घाबरली. नेमकं काय घडतंय, हे तिला समजत नव्हतं. आपल्याला काहीतरी गंभीर आजार झाला असून कॅन्सर तर झाला नाही ना, अशी भीती तिच्या मनात निर्माण झाली होती. त्यावेळी वर्गातील काही मुलींनी तिला मासिक पाळीबद्दल समजावून सांगितलं.
View this post on Instagram
मात्र, या प्रसंगात साराला आणखी एका अडचणीचा सामना करावा लागला. ती जेव्हा आपल्या जागेवरून उठली, तेव्हा तिची संपूर्ण स्कर्ट रक्तानं लाल झालेला होता. हे पाहून ती आणखी अस्वस्थ झाली. वर्गातील दोन मुलींनी तिला मधोमध घेऊन थेट मुख्यध्यापकांकडे नेलं. त्यानंतर शिक्षकांनी तिला घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. घरी गेल्यानंतर आईनं तिला समजावून सांगितलं की, मुलींना ठरावीक वयानंतर मासिक पाळी येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र, आईनंही या विषयावर तिच्याशी फारसं मोकळेपणानं बोलणं टाळलं. त्यामुळे मासिक पाळीशी संबंधित अनेक गोष्टींबद्दल तिच्या मनात शंका होती.
साराने पुढे सांगितलं की, सुरुवातीच्या काळात ती सॅनिटरी पॅडऐवजी कापड्याचा वापर करायची. तिची बहीणही मासिक पाळीदरम्यान पॅड वापरण्याऐवजी कापड वापरण्याचा सल्ला द्यायची. पॅड सुरक्षित नसतात, असं तिच्या बहिणीचं मत होतं. त्यामुळे घरात ज्या पद्धतीनं सांगितलं जायचं, त्याच पद्धतीने ती वागत होती. या सगळ्या गोष्टींबद्दल आधीपासून योग्य माहिती मिळाली असती, तर आपण आपल्या आहाराची आणि आरोग्याची अधिक काळजी घेतली असती, असंही सारानं नमूद केलं.
