मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा

शाहरुख खानसोबत 'जोश' या चित्रपटात भूमिका साकारलेल्या एका अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक दावा केला आहे. मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो. म्हणून माझे सीन्स कापले, असं त्याने म्हटलंय.

मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; जोशच्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
शाहरुख खान, जोश चित्रपट
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 25, 2026 | 12:23 PM

अभिनेता शाहरुख खानच्या ‘जोश’ या चित्रपटाशी संबंधित अभिनेत्याने केलेल्या एका दाव्यामुळे 2000 मधील हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता पुनीत वशिष्ठने शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना त्याच्या भूमिकेतील अनेक सीन्स कापण्यात आल्याचा दावा केला आहे. मन्सूर खान दिग्दर्शित ‘जोश’मध्ये शाहरुख खानने मॅक्स डिसूझा ही भूमिका साकारली होती. तर पुनीत त्याचा मित्र रॉनीच्या भूमिकेत होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुनीतने या चित्रपटाशी संबंधित किस्सा सांगितला.

पुनीतच्या म्हणण्यानुसार शूटिंगदरम्यान त्याची एनर्जी आणि परफॉर्मन्स शाहरुख खानच्या व्यक्तिरेखेवर भारी पडत असल्याचं त्याला जाणावलं. त्याने उदाहरण देताना सांगितलं की, शाहरुखने एखादा सीन करताना मोठी उडी घेतली तर तो त्यापेक्षा आणखी प्रभावी पद्धतीने परफॉर्म करत होता. त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष त्याच्या व्यक्तिरेखेकडे अधिक जाऊ लागलं. याच कारणामुळे त्याच्या भूमिकेचे काही भाग कमी करण्यात आले आणि काही सीन्स चित्रपटातून काढून टाकण्यात आले, असा दावा पुनीतने केला आहे.

विशेष म्हणजे पुनीत या घटनेबद्दल बोलताना शाहरुखवर थेट आरोप करण्याऐवजी एक वेगळाच दृष्टीकोन मांडला. त्याच्या मते, शाहरुख त्या काळात सुपरस्टार म्हणून वेगाने पुढे येत होता. अशा परिस्थितीत आपल्या वाटेत येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला दूर करण्याचा निर्णय त्याने घेतला असेल, असं पुनीत म्हणाला. मात्र आपण शाहरुखच्या जागी असतो तर कदाचित आपणही तसंच केलं असतं, असंही त्याने नमूद केलं.

या घटनेनंतर माझ्यावर मानसिकदृष्ट्याही परिणाम झाल्याचंही पुनीतने सांगितलं. काम आणि आत्मविश्वास असूनही त्याचा योग्य वापर होत नसल्याने डिप्रेशन आणि दारुच्या आहारी गेल्याचं त्याने सांगितलं. “मात्र आता त्या काळाकडे मागे वळून पाहताना मला जाणवतं की ‘जोश’ने खूप काही दिलं. आजही लोक त्या चित्रपटातील माझ्या भूमिकेची आठवण ठेवतात,” असं तो म्हणाला.

या मुलाखतीत पुनीतने घराणेशाहीविषयी त्याचं मत मांडलं. “त्यावेळी आऊटसाइडर्स आणि इनसाइडर्स यांच्यातील घराणेशाहीचा मुद्दा इतका सामान्य नव्हता. अनन्या पांडे, वरुण धवन, टायगर श्रॉफ यांच्याबाबतीत आपण आता जे पाहत आहोत, ते आता सुरू झालं आहे. त्यावेळी मापदंड निश्चित केले जात होते, घराणेशाहीची बीजे पेरली जात होती, पण ती आजच्यातितकी प्रबळ झाली नव्हती. मी शाहरुखला एक महान अभिनेता म्हणणार नाही, पण मी त्याला सर्जनशील, उत्साही सुपरस्टार नक्कीच म्हणेन.”

Follow Us