शशांक केतकरकडून मोठ्या निर्मात्याची पोलखोल; थेट चॅटचे स्क्रीनशॉट केले शेअर
अभिनेता शशांक केतकरने थेट एका बड्या निर्मात्याचं नाव घेत त्याची पोलखोल केली आहे. पाच वर्षांपासून पैसे थकवल्याचा आरोप त्याने या निर्मात्यावर केला आहे. त्याचसोबत चॅट्सचे स्क्रीनशॉट्सही त्याने शेअर केले आहेत.

अभिनेता शशांक केतकरने सोमवारी एक पोस्ट लिहित निर्मात्याने पैसे थकवल्याचा आरोप केला होता. संबंधित निर्मात्याने त्याला 5 जानेवारी 2026 ही एक तारीख दिली होती. त्यानंतरही पैसे मिळाले नाहीत तर व्हिडीओ पोस्ट करत सगळंच सांगेन, असा इशारा शशांकने दिला होता. अखेर 5 जानेवारी रोजी शशांकने याप्रकरणी सविस्तर व्हिडीओ पोस्ट करत निर्मात्यासोबतच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्सदेखील शेअर केले आहेत. ‘मी कायदेशीर कारवाई करणारच आहे, पण तूर्तास मंदार देवस्थळी (मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि ‘हे मन बावरे’ या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा पॅटर्न तुमच्याही लक्षात यावा यासाठी हा व्हिडीओ स्क्रीनशॉट्ससह पोस्ट करतोय’, असं त्याने म्हटलंय.
‘पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गयावया करतो, डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो. पाच लाख ही एखाद्यासाठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. ‘हे मन बावरे’ या मालिकेचे प्रतिदिवसाप्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले (मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्यांनी पेमेंट देताना TDS कापला आणि सरकारला भरलाच नाही, असा दुहेरी गुन्हा केला आहे. बरं ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही, सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहेत, पण आत्ता मी फक्त माझ्यासाठी बोलतो आहे. युट्यूबवर चार वर्षांपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला. त्यातही त्याचा हा थापा मारायचा पॅटर्न क्लिअर दिसतो आणि आमच्या पैशांचं केलं काय याबद्दल चकार शब्द काढत नाही तो,’ असा आरोप शशांकने केला आहे.
View this post on Instagram
शशांकने मंदार देवस्थळीसोबतच्या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले असून त्यामध्ये जेव्हा जेव्हा शशांक त्याला पैशांबद्दल विचारतो, तेव्हा लवकरच पैसे देतो, आज देतो, उद्या देतो.. अशी उत्तरं देवस्थळीकडून देण्यात आली आहेत. याशिवाय मंदारने शशांकला या मेसेजमधून वारंवार विनवणी केल्याचंही दिसतंय. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 दरम्यानचं हे दोघांमधील संभाषण आहे.
