निगरगट्ट निर्मात्याचा सगळ्याच कुंडलीसकट Video पोस्ट करेन..; शशांक केतकर संतापला, नेमकं काय घडलं?
मराठमोळा अभिनेता शशांक केतकरची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका निर्मात्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर निगरगट्ट निर्मात्याचा सगळ्याच कुंडलीसकट Video पोस्ट करेन, असा इशारा त्याने दिला आहे.

अभिनेता शशांक केतकरने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित संताप व्यक्त केला आहे. निर्मात्याने पैसे थकवल्याप्रकरणी त्याने ही पोस्ट लिहिली आहे. निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय आता, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय. एका निर्मात्याने शशांकच्या कामाचे पैसे थकवले आहेत. फुल पेमेंट जमा झालं नाही तर एक सविस्तर व्हिडीओ पोस्ट करेन, असा इशाराही त्याने दिला आहे. शशांकने थकवलेल्या पैशांबाबत अशा पद्धतीने आवाज उठवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने ‘गुनाह’ सीरिजच्या निर्मात्यांविरोधात पोस्ट लिहित संताप व्यक्त केला होता.
शशांक केतकरची पोस्ट-
‘5 वर्षे होऊन गेली. मागची 5 वर्षे आणि 8 ऑक्टोबर 2025 पासून पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्यामुळे तेव्हापासून दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही. थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा कंटाळा आलाय आता. अजून एक तारीख दिली आहे त्याने उद्याची (5 जानेवारी 2026) फुल पेमेंट जमा झालं नाही तर एक सविस्तर व्हिडीओ पोस्ट करेन. सगळ्याच कुंडलीसकट आणि पेमेंट झालं तर.. तसारी पेमेंट झाल्याचा व्हिडीओ पण पोस्ट करेन’, असं शशांकने लिहिलंय.

शशांकने त्याच्या या पोस्टमध्ये कोणत्याही निर्मात्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे आता तो सविस्तर व्हिडीओ पोस्ट करून त्यातून काय खुलासा करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शशांकची ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून शशांक घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत त्याने हिंदी आणि मराठी वेब सीरिजमध्येही काम केलंय. शशांकने याआधी ‘गुनाह’ वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनचं शूटिंग संपलं तरी पहिल्या सिझनचे पैसे न मिळाल्याचा खुलासा केला होता. इतकंच नव्हे तर पहिल्या सिझनचे पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय दुसऱ्या सिझनचं डबिंग करणार नाही, अशी अट शशांकने निर्मात्यांना घातली असता काही सीन्समध्ये त्याच्या आवाजाऐवजी दुसऱ्या एका डबिंग आर्टिस्टकडून डायलॉग्स डब करून घेतल्याचा त्याने आरोप केला होता.
